जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

रोहिणी खडसे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी वर्णी

1 min read

मुंबई: (वृत्तसंस्था)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महिला प्रदेशाध्यक्षपदावर रोहिणी खडसे यांची निवड केली आहे. विद्या चव्हाण यांच्या जागी रोहिणी खडसे यांना संधी देण्यात आली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात विरोधी आघाडीI.N.D.I.A.ची बैठक मुंबईत होणार आहे. या संदर्भात मंगळवारी २९ ऑगस्ट रोजी हयात हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह उद्धव ठाकरे, नाना पटोले, संजय राऊत, राघव चढ्ढा यांच्यासह अन्य विरोधी पक्षाचं नेते उपस्थित होते.

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी बैठकीत तयारीचा आढावा घेतला. या बैठकीनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मोठा निर्णय घेतला. त्यांनी महिला प्रदेशाध्यक्षपदावर रोहिणी खडसे-खेवलकर यांना स्थान दिले आहे.

शरद पवार हे लवकरच जळगावात सभा घेणार आहेत. या सभेची जबाबदारी एकनाथ खडसे यांनी घेतली आहे. या सभेत रोहिणी खडसे यांना मुक्ताईनगरच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार म्हणून प्रोजेक्ट केले जाणार आहे असल्याची चर्चा आहे. अजित पवार आणि इतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या बंडानंतर एकनाथ खडसे हे शरद पवार यांच्या सोबत कायम राहिले. त्यामुळे त्यांच्या कन्येला ही जबाबदारी मिळाल्याचे सांगितले जात आहे.

कोण आहेत रोहिणी खडसे-खेवलकर ?

रोहिणी खडसे या महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि आमदार एकनाथ खडसे यांच्या कन्या आहेत. त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले आहे. रोहिणी यांनी एलएलबी आणि त्यानंतर एलएलएम केले आहे.

विशेष म्हणजे

२०१९ मध्ये भाजपने एकनाथ खडसे यांची उमेदवारी नाकारली होती. त्यानंतर पक्षाने उत्तर महाराष्ट्रातील मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून रोहिणी यांना तिकीट दिले.

मात्र, त्या निवडणुकीत अल्पशा फरकाने पराभूत झाल्या. यानंतर एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधे प्रवेश केल्यावर रोहिणी खडसे यांनीही पक्षात प्रवेश केला.

रोहिणी यांनी २०१५ते २०२१या कालावधीत जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद भूषवले होते, तर २०१५ पासून आतापर्यंत त्या महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्ष आहेत.
आदिशक्ती मुक्ताई सहकारी सूत गिरणी लिमिटेडच्या २०१३ पासून ते आत्तापर्यंत त्या अध्यक्ष होत्या. त्यांच्या कार्यकाळात बँकेने संगणकीकरण, एटीएम या सेवा सुरू केल्या. या काळात बँकेने अनेक क्षेत्रात पुरस्कार पटकावले आहेत. मुक्ताईनगर येथील आदिशक्ती मुक्ताई सहकारी सूतगिरणीच्या अध्यक्षा असून त्यांनी एकनाथ खडसे यांनी स्थापन केलेली परंतु काही कारणाने अपूर्णावस्थेत असलेली सूतगिरणी सुरू करून स्थानिक महिला आणि युवकांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या रोहिणी खडसे उपाध्यक्ष आहेत.याचबरोबर त्या मुक्ताईनगर परिसरातील प्रमुख शैक्षणिक संस्था असलेल्या मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी मुक्ताईनगरच्या अध्यक्षा आहेत. यासंस्थेअंतर्गत बालवाडी ते पदव्युत्तर शिक्षणाची सोय आहे.

रोहिणी खडसे यांना राजकारणाचे धडे वडील एकनाथ खडसे यांच्याकडून मिळाले. एकनाथ खडसे यांच्या बरोबरीने त्या जळगाव जिल्ह्यात भाजपचे काम करत होत्या.
मात्र, वडिलांमुळे त्यांच्या राजकीय जीवनाला कलाटणी मिळाली आणि त्या भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाल्या.

२०१४साली राज्यात भाजपचे सरकार सत्तेत आल्यापासून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. पक्षात ज्येष्ठ असलेल्या एकनाथ खडसेंनी त्यानंतर आपले फडणवीसांसोबतचे मतभेद कधी लपवले नाहीत. भारतीय जनता पक्षात त्यांची कोंडी होत असल्याचे आरोप त्यांनी अनेकदा केले होते.
जळगाव मध्ये गिरीश महाजन यांचे भाजपातील महत्त्व वाढले आणि खडसे पक्षापासून दूर जात होते. त्यात २०१९मध्ये मुलगी रोहिणी खडसे यांना तिकीट दिले गेले. त्या पराभूत झाल्या आणि एकनाथ खडसे यांच्या नाराजीत भर पडली.
एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबतच रोहिणी यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विस्तारासाठी मोठं योगदान दिले.

मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात त्यांनी राष्ट्रवादी जनसंवाद यात्रा काढली होती. राज्यात जनसंवाद यात्राही पहिल्यांदाच रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर मतदारसंघात काढली होती.
या यात्रेचे जळगाव जिल्ह्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, याबरोबरच वरिष्ठ नेत्यांनी मोठं कौतुक केले होते. तसेच इतर जिल्ह्यात अशाच पद्धतीने जनसंवाद यात्रा काढण्याच्या पदाधिकाऱ्यांना आदेशित केले होते. यात्रेदरम्यान त्यांनी मुक्ताईनगर मतदारसंघातून १८२ गावं वस्त्या वाड्यांवर जाऊन तेथील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न केला शिवाय पक्षाची सदस्य नोंदणी केली होती.
कापूस, केळी कांदा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी काढलेला जनआक्रोश मोर्चा लक्षवेधी ठरला होता.महिला अत्याचाराविरोधात त्यांनी मूक मोर्चाचे आयोजन केले होते त्यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
महिला सक्षमीकणासाठी त्या विविध उपक्रम राबवत असतात याशिवाय पक्षाचे विविध आंदोलने, सभा , कार्यक्रम उपक्रमामध्ये त्यांचा मुख्य सहभाग असतो त्यांचे कार्य बघून पक्षाने त्यांना महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे.

दरम्यान ,रोहिणी खडसे यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, “जळगाव जिल्ह्यातील अगदी दोन चार कार्यकर्ते अजित पवार यांच्यासोबत गेले. जळगावमध्ये संपूर्ण पक्ष हा शरद पवार यांच्या सोबत आहे.आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आगामी होणाऱ्या जळगावच्या सभेत शरद पवार यांची ताकद दिसून येईल.”

Copyright © All rights reserved. | www.beedsamratnews.com Designed by www.WizInfotech.com.