जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

देशातील नवनिर्वाचित २५१ खासदारांवर फौजदारी गुन्हे

1 min read

नवी दिल्ली :(वृत्तसंस्था) भारतीय लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात निवडून येणाऱ्या कलंकित खासदारांची संख्येत वाढ होत चालली आहे. नुकत्याच लागलेल्या निकालात अठराव्या लोकसभेच्या ५४३ नवनिर्वाचित खासदारांपैकी तब्बल २५१ (४५ %) खासदारांवर फौजदारी स्वरूपाचं गुन्हे दाखल आहेत. संसदेच्या कनिष्ठ सभागृहात गुन्हेगारी आरोप असलेल्या वा सिद्ध झालेल्या सदस्यांची ही संख्या सर्वाधिक आहे.

महिला खासदारांच्या संख्येत घट

त्याच वेळी महिला खासदारांची संख्या मात्र ७७ वरून कमी होऊन ७४ वर म्हणजेच (१४ टक्के) आली आहे.

असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रीफॉर्म्स’ (ADR) या निवडणूक विश्लेषण संस्थेने ही माहिती दिली आहे.

नवनिर्वाचित १४ टक्के महिला खासदारांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सर्वाधिक ३१, तर काँग्रेसच्या १३, तृणमूल काँग्रेस ११, समाजवादी पक्ष ५, लोकजनशक्ती (रामविलास) २ आणि इतर पक्षांच्या खासदार आहेत. सन २०१९च्या लोकसभा निवडणुकीत ५३९पैकी ७७ खासदार महिला होत्या. सन २०१९मध्ये निवडून आलेल्या २३३ खासदारांवर (४३ %) गुन्हे दाखल होते. त्या आधीच्या लोकसभेत ही संख्या १८५ (३४ %), सन २००९मध्ये १६२ (३० %) होती. सन २००४ मध्ये १२५ (२३ %) खासदारांवर गुन्हे दाखल होते. या विश्लेषणानुसार, सन २००९पासून गुन्हेगारी खटले असलेल्या खासदारांच्या संख्येत तब्बल ५५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

यंदा २५१ कलंकितांपैकी १७१ (३१ %) खासदारांवर बलात्कार, हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण आणि महिलांवरील गुन्ह्यांसह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

सन २००९ पासून गंभीर गुन्ह्यांची शिक्षा असलेल्या संसद सदस्यांची संख्या १२४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदा चार उमेदवारांवर भारतीय दंड संहितेचे (आयपीसी) कलम ३०२ म्हणजे थेट हत्येचा गुन्हा असल्याचे त्यांच्या प्रतिज्ञापत्रात म्हंटले आहे.

१५ नवनिर्वाचित खासदारांवर बलात्कार व महिलांवरील गुन्ह्यांचे खटले (कलम ३७६) दाखल आहेत.

या १८ व्या लोकसभेत सर्वांत मोठा पक्ष म्हणून आपले स्थान कायम ठेवणाऱ्या भाजपच्या २४० विजयवीरांपैकी सर्वाधिक ९४ (३९%) उमेदवारांनी स्वतःविरुद्ध गुन्हे दाखल असल्याचे म्हंटले आहे. काँग्रेसच्या ९९ विजयी उमेदवारांपैकी ४९, सपच्या ३७पैकी २१, तृणमूल काँग्रेसच्या २९पैकी १३, द्रमुक २२ पैकी १३ (५९ %) तेलुगू देसम १६पैकी०८ आणि शिवसेनेच्या ०७ पैकी ०५ (७१ %) विजयी उमेदवारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत.

सर्वाधिक श्रीमंत खासदार

श्रीमंतामध्ये तेलुगू देसमचा खासदार अव्वल स्थानी आहे. पहिल्या तीन श्रीमंत उमेदवारांमध्ये तेलुगू देसमचे डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी ५,७०५ कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्तीसह अव्वल स्थानावर आहेत. तर दुसऱ्या स्थानावर तेलंगणचे कोंडा विश्वेश्वर रेड्डी (भाजप) हे आहेत. त्यांच्याकडे ४,५६८ कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता आहे. आणि तिसऱ्या स्थानावरील भाजपचे नवीन जिंदाल (हरयाणा) यांच्याकडे १,२४१ कोटी रुपयांपेक्षा जास्त माया आहे. पहिल्या १० श्रीमंत खासदारांत भाजपचे पाच, टीडीपीचे तीन आणि काँग्रेसचे दोन आहेत. ही माहिती त्यांच्या प्रतिज्ञापत्रातील असून इतर संपत्तीचा समावेश अहवालात करण्यात आलेला नाही.

Copyright © All rights reserved. | www.beedsamratnews.com Designed by www.WizInfotech.com.