महिन्याच्या सुरवातीलाच ग्राहकांना झटका ; एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ
1 min readदर महिन्याच्या एक तारखेला एल.पी.जी. सिलिंडरच्या किंमती जाहीर करण्यात येत असतात. आजपासून ऑगस्ट महिना सुरू झाला असून तेल कंपन्यांनी सकाळी ६ वाजता एल.पी.जी. सिलिंडरच्या किमती अपडेट केल्या आहेत. तेल कंपन्यांच्या अपडेटनुसार व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. मात्र घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
नवी दिल्ली: (वृत्तसंस्था) अर्थसंकल्पानंतर १ ऑगस्ट रोजी एल.पी.जी. सिलिंडरच्या नवीन किंमती जाहीर झाल्या असून तेल विपणन कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक एल.पी.जी. सिलिंडरच्या किंमतीत वाढ केली असून अशाप्रकारे, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी तेल कंपन्यांनी सर्वसामान्यांना धक्का दिला आहे. तेल कंपन्यांनी सकाळी ६ वाजता एल.पी.जी. सिलिंडरच्या किंमती जाहीर केल्या आणि पुन्हा एकदा व्यवसायिक एल.पी.जी. सिलिंडरच्या किंमतीत वाढ केली आहे. मात्र घरगुती सिलिंडरचे दर अजूनही स्थिर आहेत.
LPG सिलिंडर पुन्हा महागला
गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे बजेट वाढेल. ऑईल कंपन्यांनी आजपासून ही दरवाढ लागू केली आहे. आजपासून व्यावसायिक सिलिंडर ८.५० रुपयांनी महागला असून दिल्ली ते मुंबई आणि कोलकाता ते चेन्नई सिलिंडरचे सुधारित दर लागू करण्यात आले आहेत.
गेल्या महिन्यात म्हणजेच जुलैमध्ये तेल विपणन कंपन्यांनी एल.पी.जी. सिलिंडरची किंमत ३० रुपयांनी कमी झाली होती.
व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती
IOCL च्या वेबसाइटवरून व्यावसायिक सिलिंडरचे नवीन दर आजपासून लागू झाले आहेत.
देशाची राजधानी दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरची किंमत १,६५२.५० रुपये झाली जी यापूर्वी १,६४६ रुपये होती.
कोलकात्यात व्यावसायिक सिलिंडरची किंमत १,७५६ रुपयांवरून १,७६४.५ रुपयांपर्यंत वाढली आहे.
आजपासून मुंबईत व्यावसायिक सिलिंडर १,६०५ रुपयांना उपलब्ध आहे.
चेन्नईतही व्यावसायिक सिलिंडर महाग झाले आणि आजपासून येथे १,८०९.५० रुपयांऐवजी १,८१७ रुपये मोजावे लागतील.
घरगुती LPG सिलिंडरच्या किंमती स्थिर
एकीकडे व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत सातत्याने बदल होतांना दिसत आहे तर दुसरीकडे तेल विपणन कंपन्यांनी घरगुती सिलिंडरच्या किमती दीर्घ काळापासून स्थिर ठेवण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने महिला दिनानिमित्त मोठा दिलासा देत घरगुती सिलिंडरवर गृहिणींना मोठा दिलासा दिला. त्यानंतर घरगुती सिलिंडरची किंमत शंभर रुपयांनी कमी झाली तर, तेंव्हापासून सध्या या सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही आणि एका सिलिंडरची किंमत दिल्लीत ८०३ रुपये, कोलकात्यात ८२९ रुपये, मुंबईत ८०२.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ८१८.५० रुपये एवढी आहे.