जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प न्यायालयात हजर

1 min read

मियामी: ( वृत्तसंस्था) गोपनीय कागदपत्रे अयोग्य पद्धतीने वापरल्यामुळे अडचणीत आलेल्या अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षातर्फे पुन्हा उमेदवारीच्या शर्यतीत उतरलेले नेते डोनाल्ड ट्रम्प न्यायालयात हजर होत आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत आपण निर्दोष असल्याचे बाजू मांडताना सांगितले. गोपनीय कागदपत्रांच्या प्रकरणी ट्रम्प मंगळवारी पुन्हा एकदा मियामी न्यायालयात हजर झाले होते. यादरम्यान त्यांनी मियामी न्यायालयात अधिकाऱ्यांसमोर शरणागती पत्करली. माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे गोपनीय कागदपत्रे प्रकरणा सहीत इतर ३७ प्रकरणांमध्ये त्यांच्या आयुष्यातील सर्वात गंभीर कायदेशीर लढाईला सामोरे जात आहेत. एकुण ३७ आरोपातून ३१ आरोप सरकारी गोपनीय कागदपत्रांशी संबंधित आहेत. आपल्या देशाच्या इतिहासातील हा सर्वांत दुःखद दिवस आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी न्यायालयात जाण्यापूर्वी व्यक्त केली होती.
न्यायालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणी ट्रम्प आणि त्यांचे सहकारी वॉल्ट नौटा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरुद्ध चालू असलेल्या खटल्यादरम्यान कोर्टात कॅमेरे किंवा कारवाईचे थेट प्रक्षेपण करण्याची परवानगी नव्हती. अलिकडच्या काही महिन्यांत ट्रम्प न्यायालयात हजर होण्याची ही दुसरी वेळ आहे. एप्रिलमध्ये एका पॉर्न स्टारला गप्प बसण्यासाठी पैसे दिल्याच्या आरोपावरून ते न्यायालयात हजर झाले होते. त्या प्रकरणात त्यांनी स्वतःला निर्दोष असल्याचे म्हटले आहे.
मंगळवारच्या हजेरीदरम्यान ट्रम्प यांचे समर्थक कोर्ट हाउसबाहेर जमले होते. ते ट्रम्प यांच्या समर्थनार्थ घोषणा देत होते. दरम्यान ट्रम्प यांच्या सुरक्षेला कोणताही धोका नसल्याचे मियामीचे महापौर फ्रान्सिस सुआरेझ यांनी न्यायालयाबाहेर पत्रकारांना सांगितले. बाहेर जरी ५० हजार लोकांचा जमाव आला आणि संभाव्य हिंसाचाराचा विचार केला तरी त्याचा सामना करण्यासाठी आमचे अधिकारी सक्षम आहेत, असे महापौर म्हणाले. दरम्यान ट्रम्प सतत आपण निर्दोष आहोत, असा दावा करत आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष जो बायडेन यांचे प्रशासन आपल्याला लक्ष्य करत असल्याचे आरोपही डोनाल्ड ट्रम्प हे करत आहेत.

Copyright © All rights reserved. | www.beedsamratnews.com Designed by www.WizInfotech.com.