जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची सिनेमा जगात सेकंड इनिंग

1 min read

मुंबई: (वृत्तसंस्था)सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे ह्या अनेक मराठी सुपरडुपरहिट चित्रपटांमध्ये झळकलेल्या आहेत. लोकप्रिय अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची आता सिनेइंडस्ट्रीतली सेकंड इनिंग सुरू आहे. लहानपणापासूनच घरी नाटक-सिनेमांचे वातावरण पाहिलेल्या प्रिया बेर्डे यांचे या क्षेत्रात पाऊल टाकणे तसे स्वाभाविकच होते. नृत्य हा त्यांचा जीव की प्राण. बालकलाकार म्हणून सुरुवात केलेल्या प्रिया यांच्या अभिनयाची ‘रंगत संगत’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.प्रिया बेर्डे यांच्या वाट्याला बहुतांश ग्रामीण क्षेत्राशी निगडित असलेल्या भूमिका आल्या . त्यामुळे‌ त्यांच्या तोंडी असलेले संवाद हे ग्रामीण बाजाचे होते. खरं तर प्रत्यक्षात त्यांना ग्रामीण भाषा बोलता येत नव्हती, एका मुलाखतीत त्यांनी याबद्दल सांगितलं.मी दादरसारख्या ठिकाणी लहानाची मोठी झाले. घरी देखील ब्राह्मणी वातावरण असल्यामुळे सुरुवातीला मला ग्रामीण भाषेतले संवाद बोलणे फार अवघड जायचे. पण, माझ्या आईने माझा हा पेच सोडवला. ती नाटकातून काम करत असल्यामुळे तिला याची माहिती होती. तिने मला खूप काही शिकवले , असे प्रिया यांनी सांगितले.’अशी ही बनवाबनवी’ हा सिनेमा जरी सचिन पिळगावकर, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांचा असला तरी त्या सिनेमातल्या प्रिया याच्या ‘कमळी’ या भूमिकेने त्यांना ओळख निर्माण करून दिली. या चित्रपटाने प्रिया यांचा चेहरा प्रेक्षकांच्या ओळखीचा झाला होता.त्यांनतर प्रिया यांनी ‘थरथराट’, ‘नशीबवान’, ‘शेम टू शेम’ यासारखे बरेच चित्रपटात काम केले. आपल्या आवडत्या भूमिकेविषयी प्रिया यांनी सांगितले की, शेम टू शेम’ या चित्रपटात माझी दुहेरी भूमिका होती. एक जण तमाशात नाचणारी आणि दुसरी शाळेमध्ये शिकवणारी शिक्षिका. या भूमिका माझ्या आवडीच्या काही मोजक्या भूमिकांमधल्या आहेत.प्रिया यांनी कमी वयातच बालकलाकार म्हणून कामाला सुरुवात केली होती. आई लता अरुण नाटकांमधून काम करायची आणि बाबा अरुण कर्नाटकी दिग्दर्शक होते. त्यामुळे घरात अभिनय, नाटक, सिनेमा हे वातावरण त्या लहानपणापासूनच पाहत होत्या. प्रिया यांची मामी माया जाधव उत्कृष्ट नृत्यांगना होती. आजुबाजूला हे सर्व बघत असल्यामुळं आपसूकच त्यांच्यावर ते संस्कार होत होते. पण, सुरुवातीला मला अभिनयापेक्षा नृत्यातच जास्त रस होता; किंबहुना आजही आहे, असे प्रिया बेर्डे सांगतात.‌

Copyright © All rights reserved. | www.beedsamratnews.com Designed by www.WizInfotech.com.