बीड – परळी मार्गाचे चौपदरीकरण करा.,एस.एम.देशमुख यांची नितीन गडकरी यांच्याकडे मागणी
1 min readमुंबई: (प्रतिनिधी )-बीड – परळी – नांदेड या महामार्गाचे चौपदरीकरण करावे तसेच पाडळसिंगी – वडवणी – धारूर – आडस – लोखंडी सावरगाव हा मार्ग त्वरित राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरीत करून त्याचे चौपदरीकरण करावे अशी मागणी जेष्ठ पत्रकार एस.एम.देशमुख यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
मराठी पत्रकार परिषदेचा पुरस्कार वितरण सोहळा नुकताच मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख होते.यावेळी पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ जोशीं उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात एस.एम.देशमुख यांनी पत्रकारांनी सतत सहा वर्षे केलेल्या आंदोलनानंतर तयार होत असलेल्या मुंबई – गोवा महामार्गाचे काम गेली बारा वर्षे रखडल्या बद्दल खंत व्यक्त करून हे काम लवकर मार्गी लागावे तसेच मुंबई गोवा महामार्गाला आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव द्यावे अशी मागणी केली आहे.
बीड जिल्ह्यातील रस्त्यांकडे देखील एस.एम.देशमुख यांनी नितीन गडकरी यांचं लक्ष वेधलं. बीड – परळी – नांदेड हा रस्ता २०१७ मध्येच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग झाला आहे.एनएच ३६१ एफ असा क्रमांकही या रस्त्याला मिळालेला आहे.आता हा रस्ता सिमेंट कॉंक्रीटचा होत असला तरी रस्त्यावरील वाढती वाहतूक लक्षात घेता हा रस्ता चौपदरी करावा अशी मागणी एस.एम देशमुख यांनी केली.तसेच पाडळसिंगी – वडवणी – धारूर – आडस – लोखंडी सावरगाव हा मार्ग तातडीने नॅशनल हायवे अँथॉरिटीकडे सुपूर्द करून तो रस्ता चौपदरी केला तर लातूरला संभाजीनगरशी (औरंगाबाद)जोडणारा सर्वात जवळचा मार्ग ठरेल. शिवाय या महामार्गामुळे बीडच्या विकासाला देखील गती मिळेल ही बाब देशमुख यांनी आपल्या भाषणातून गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिली.
एस.एम.देशमुख, डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे, मराठी पत्रकार परिषद बीड जिल्हा अध्यक्ष विशाल साळुंके, उपाध्यक्ष रवी उबाळे, यांनी वरील मागणीचे निवेदनही गडकरी यांना दिले आहे.आपल्या भाषणात नितीन गडकरी यांनी मुंबई – गोवा महामार्गाचे काम येत्या डिसेंबर पर्यत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.तसेच बीड – परळी आणि पाडळसिंगी – लोखंडी सावरगाव या रस्त्यांबाबतची माहिती घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन गडकरी यांनी दिले आहे.या विषयाचा पाठपुरावा करण्यासाठी मराठी पत्रकार परिषद बीडचे पदाधिकारी एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा नितीन गडकरी यांची भेट घेणार आहेत.