जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

राज्यात अपघातांची मालिका सुरूच, भरधाव वेगात असलेला कंटेनर हाँटेलमध्ये शिरला, १० जणांचा जागीच मृत्यू

1 min read

धुळे: (प्रतिनिधी)- राज्यात अपघातांची मालिका सुरूच असून काही दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा जवळ समृद्धी महामार्गावर एका खासगी बसचा भीषण अपघात होऊन २६ जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या अपघाताची घटना ताजी असतानाच आता धुळे-मुंबई-आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातील पळासनेर गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. ब्रेक फेल झाल्याने भरधाव कंटेनर हॉटेलमध्ये शिरल्याने हा अपघात झाला आहे. या भीषण अपघातात १० जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर मृतांची संख्या वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. या अपघातात १५ ते २० जण जखमी झाले आहेत. त्यात काही जण गंभीर असल्याचे समजते. मुंबई-आग्रा महामार्गावरील पळासनेर बायपासवर आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त होत असून, मदतकार्य सुरू झालेले आहे. आग्राकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या १४ चाकी कंटेनरचा ब्रेक अचानक फेल झाल्याने या कंटेनरने सुरवातीला समोर चालणाऱ्या दोन वाहनांना उडविले. हा अपघात इतका भयानक होता की, त्यानंतर रस्त्यालगत असलेल्या हॉटेलमध्ये हा कंटेनर घुसून दुसऱ्या बाजूने बाहेर पडला. दरम्यान, अपघाताचे वृत्त समजताच घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून स्थानिकांच्या मदतीने युद्ध पातळीवर मदतकार्य सुरु करण्यात आले आहेत.

Copyright © All rights reserved. | www.beedsamratnews.com Designed by www.WizInfotech.com.