जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

13 September 2024

पाचशे रूपये पर्यंत घसरलेल्या केळीचे भाव तीन हजार पर्यंत जाण्याची शक्यता

1 min read

नांदेड: (प्रतिनिधी)- बऱ्याच जिल्ह्यांत पावसाने ओढ दिल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत आता नांदेडच्या केळीला २२०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला आहे. तीन महिन्यांपूर्वी केळीचे दर प्रति क्विंटल अडीच हजार रुपयांवरून ५०० रूपयांवर घसरले होते. त्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या केळी उत्पादकांना आता दिलासा मिळाला आहे.केळी उत्पादनात राज्यात जळगावनंतर मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागतो. नांदेड जिल्ह्यासह शेजारील हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांतील काही भाग असे जवळपास १५ हजारांपेक्षाही अधिक हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड केली जाते. विशेष म्हणजे नांदेडमधील अर्धापूरची केळी जगप्रसिध्द असून केळीला देशविदेशात मोठी मागणी असते. दरम्यान एप्रिल आणि मे महिन्यात वादळी वारा तसेच गारपिटीमुळे अर्धापुर आणि मुदखेड तालुक्यातील केळीच्या बागांचे मोठे नुकसान झाले होते.शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास आस्मानी संकटाने हिरावून घेतला होता. त्यामुळे मागील दोन ते तीन महिन्यांपासून प्रति क्विंटल अडीच हजार रुपयांपर्यंत गेलेले केळीचे दर ५०० ते ६०० रुपयांवर येवून ठेपले होते. भाव घसरल्याने केळी उत्पादक शेतकरी मोठ्याप्रमाणात आर्थिक अडचणीत सापडले होते. आता केळीला २२०० रूपये प्रति क्विंटल भाव मिळत असून केळीचे दर पूर्ववत होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अर्धापूर तालुक्यातील केळी प्रसिद्ध आहे. देश विदेशा पर्यंत अर्धापूरच्या केळीला मागणी असल्याने दरवर्षी आखाती देशात केळीची निर्यात केली जाते. इराण, इराक, दुबई यासह इतर देशात केळी पाठवली जातात. गतवर्षी पाकिस्तानला केळीची निर्यात करण्यात आली होती. मात्र अवकाळी पावसामुळे केळीचे मोठे नुकसान झाल्याने देश विदेशातील निर्यात प्रक्रिया थांबली होती. आता पुन्हा इराक, इराणसह अन्य देशात केळी निर्यात करण्यात आली आहे. मागील तीन ते चार महिन्यांपासून केळीचे दर घसरले होते. आता पुन्हा दर वाढण्यास सुरूवात झाली आहे. पुढील काही दिवस सण उत्सवाला सुरुवात होणार असल्याने केळीची मागणी वाढणार आहे. त्यामुळे केळीचे दरही ३००० रुपये प्रति क्विंटल पर्यंत जातील, असे व्यापाऱ्यांकडून अंदाज वर्तविण्यात येत आहेत.