जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

पश्चिम बंगालमध्ये निवडणूकीदरम्यान हिंसाचार,१२ जणांचा मृत्यू

1 min read

कोलकाता: (वृत्तसंस्था)- पश्चिम बंगालमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असून यात पंचायत निवडणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचारात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती शनिवारी अधिकाऱ्यांनी दिली आहे. या हिंसाचारात सत्ताधारी तृणमूल काँग्रेसपक्षाचे आठ सदस्य तर भाजप, माकप, काँग्रेस आणि इंडियन सेक्युलर फ्रंट (आयएसएफ) यांचा प्रत्येकी एक कार्यकर्ता ठार झाला आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून या हिंसाचाराला सुरुवात झाली होती.आगामी लोकसभा निवडणुकीची ‘लिटमस चाचणी’ म्हणून विश्लेषक बंगालमधील या निवडणुकीकडे पाहत आहेत. शनिवारी झालेल्या मतदानादरम्यान मतपेट्यांची चोरी, जाळपोळ आणि राजकीय कार्यकर्त्यांविरोधात जनक्षोभाचे दृश्यही पाहायला मिळाले. मुर्शिदाबाद, नादिया आणि कूचबिहार जिल्ह्यांव्यतिरिक्त दक्षिण २४ परगणामधील भांगर आणि पूर्व मेदिनीपूरमधील नंदीग्राममध्ये हिंसाचार झाला असल्याचे वृत्त आहे.
राज्यातील ग्रामीण भागांतील ७३,८८७ जागांवर शनिवारी सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली असून, ५.६७ कोटी मतदार जवळपास २.०६ लाख उमेदवारांचे भवितव्य ठरवतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दुपारी तीन वाजेपर्यंत ५०.५२ टक्के मतदान झाल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात २२ जिल्ह्यांमध्ये ६३,२२९ ग्रामपंचायतींच्या जागा आणि ९,७३० पंचायत समित्यांच्या जागा आहेत, तर २० जिल्ह्यांमध्ये ९२८ जिल्हा परिषदेच्या जागा आहेत. दरम्यान पश्चिम बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांनी उत्तर २४ परगणामधील हिंसाचारग्रस्त विविध भागांना भेटी दिल्या. हिंसाचारात जखमी झालेल्यांची भेट घेतली आणि त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. ‘वाटेत असलेल्या नागरिकांनी राज्यपालांना ताफा थांबवण्याची विनंती केली. सांगण्यासारखे कितीतरी किस्से आहेत, आजूबाजूला घडणाऱ्या खुनाच्या घटना त्यांनी मला सांगितल्या. गुंडांनी मतदान केंद्रांवर जाऊ दिले नाही आणि पीठासीन अधिकाऱ्यांनी त्यांचे ऐकले नाही, असेही लोकांनी सांगितले,’ असे बोस म्हणाले. दरम्यान शांतता राखण्याचे आवाहनही बोस यांनी केले आहे.

Copyright © All rights reserved. | www.beedsamratnews.com Designed by www.WizInfotech.com.