जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

नाशिकमध्ये एसटी बस दरीत कोसळून भीषण अपघात

1 min read

नाशिक: (वृत्तसंस्था)- राज्यात अपघातांच्या घटना काही थांबेना काही दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गावर बुलढाण्याजवळ झालेल्या भीषण अपघातात २५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच नाशिकमध्येही भीषण बस अपघात झाल्याचे समोर आले आहे. सप्तश्रृंगी गडाच्या घाटात एसटी बस दरीत कोसळून मोठा अपघात झाला आहे. यावेळी एकाचा मृत्यू झाला, तर बसमधून प्रवास करणारे २२ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी काही जणांना प्रथमोपचार करुन सोडून देण्यात आले आहे, तर काही प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सप्तश्रृंगी गडाच्या घाटात गणपती टप्प्यावरुन बस दरीत कोसळल्याची माहिती आहे. आज पहाटे साडेसहा -पावणेसात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सप्तश्रृंगी गडावरुन बुलढाण्यातील खामगाव येथे जात असताना बस दरीत कोसळली. यावेळी बसमध्ये २२ जण प्रवास करत होते. १६ प्रवासी हे अमळनेर तालुक्यातील मुडी या गावचे असून गडावरील ४ प्रवासी आहेत. इतर दोघांमध्ये बस चालक व कंडक्टरचा समावेश आहे. बस क्रमांक एमएच.४० एक्यु ६२५९ वर ड्रायव्हर गजानन टपके, कंडक्टर पुरुषोत्तम टिकार कर्तव्यावर होते. अपघातात ड्रायव्हर गंभीर जखमी झालाय, असे खामगाव आगार सहाय्यक कर्मचारी शुभांगी पवार यांनी सांगितले.बस रात्री सप्तश्रृंगी गडावर मुक्कामी होती. पहाटेच्या सुमारास बस गडावरुन खाली यायला निघाली. दाट धुक्याचा परिसर, सातत्याने पडणारा पाऊस आणि घाटात असलेल्या अवघड वळणांवर चालकाचा ताबा सुटून बसचा भीषण अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, बचावपथक, रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या असून जखमी प्रवाशांना जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अपघातग्रस्त बस ही खामगाव डेपोची असून त्यातील 18 प्रवासी जखमी झाले आहेत. गणपती पॉइंट जवळ वणी गड उतरत असताना हा अपघात झाला आहे.

Copyright © All rights reserved. | www.beedsamratnews.com Designed by www.WizInfotech.com.