जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

13 September 2024

समुद्रकिनारे ठरत आहेत जीव घेणे

1 min read

मुंबई: (वृत्तसंस्था)- लोकांकडून समुद्रकिनाऱ्यावर वारंवार सूचनांचे उल्लंघन केले जात असून यामुळे आपला जीव गमवावा लागत आहे. ‘जल ही जीवन है ‘ हे तर आपल्याला माहितच आहे. पण, जर पाण्याशी खेळ केला तर तो विनाशही करु शकतो. पण, समुद्रकिनारी जाताना काळजी घ्या, असं वारंवार सांगूनही अनेकजण या सूचनेकडे दुर्लक्ष करतात आणि मग त्यांच्यासोबत अघटित घडते. मुंबईत काल सकाळपासूनच पावसाची उघडीप सुरू असतानाच रविवारी सकाळच्या सुमारास पाच अल्पवयीन मुले मालाड पश्चिमेकडील मार्वे समुद्रात बुडाली. ही घटना सकाळी साडे नऊच्या सुमारास घडली. या पैकी दोन मुलांना समुद्र किनाऱ्यावर उपस्थित स्थानिकांनी वाचवले. तर तीन मुले अद्यापही बेपत्ता असून नौदल, तटरक्षक दलाकडून त्यांचा शोध सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून समुद्र किनाऱ्यावर अपघातांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. तेरा जुन रोजी जुहू समुद्रात १२ ते १६ वयोगटातील पाच अल्पवयीन मुले पोहायला गेली होती. यापैकी चार जणांचा मृत्यू. तसेच १८ जुनला मालाड अक्सा किनाऱ्यावर पोहोयाला गेलेल्या १९ जणांना जीवरक्षक दलाने वाचवले. १० जुलै कुटुंबीयांसोबत वांद्रे पश्चिम येथील बॅंड स्टॅंड येथे गेलेली २७ वर्षीय तरुणी फोटो काढताना दगडावरून पाय घसरून पडल्याने, समुद्रात बुडून तिचा मृत्यू झाला . असे कित्येक घटना समोर आल्या आहेत. दरम्यान असाच एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. मुंबईतील वांद्रे येथील बँडस्टँडवर एक जोडपं कुटुंबासोबत एन्जॉय करत होते, मात्र काहीच क्षणात त्यांच्या आनंदावर विरजण पडले. सदरील जोडपं हे बँडस्टँडवरील दगडावर बसून समुद्राच्या लाटांचा आनंद घेत होते. त्यांची चिमुरडी त्यांचा व्हिडिओ बनवत होती. व्हिडिओमध्ये मुलीचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता. समुद्राच्या मोठ्या लाटा उठत होत्या, पती-पत्नी एकमेकांना धरून होते. लाटांचा आनंद घेत होते. मुलगी त्यांना म्हणत होती की परत या. पण, त्यांनी काही ऐकले नाही. यानंतर एक जोरदार लाट येते आणि ती महिला पतीसह वाहून जाते. व्हिडिओमध्ये ‘मम्मी-मम्मी…’ अशी ओरडणाऱ्या मुलीचा घाबरलेला आवाज स्पष्टपणे ऐकू येत आहे. ज्योती सोनार (३२) असे या महिलेचे नाव असून महिलेचा पती मुकेश हा गौतम नगर, रबाळे, मुंबई येथे राहणारा असून एका खासगी कंपनीत टेक्निशियन म्हणून काम करतो. तो म्हणाला, “मी तिला वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. जेंव्हा चौथी लाट आम्हाला मागून धडकली तेंव्हा माझा तोल गेला आणि आम्ही दोघेही घसरलो. मी माझ्या बायकोची साडी पकडली तेंव्हा एका माणसाने माझा पाय धरला, पण मी तिला वाचवू शकलो नाही. तो पुढे म्हणाला, “मी तिला घट्ट पकडलं होतं पण, ती साडीमधून घसरली आणि माझ्या डोळ्यासमोर समुद्रात ओढली गेली. माझी मुलं तिथे होती. त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला मात्र कोणीही काहीही करू शकले नाही.” सायंकाळी ५.१२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. उपस्थित लोकांनी पोलिसांना माहिती दिली. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांसह पोलीस घटनास्थळी पोहोचले. मुंबई अग्निशमन दलाच्या शोध मोहिमेनंतर रविवारी रात्री उशिरा ज्योतीचा मृतदेह सापडला. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथे पोहोचताच त्यांना मृत घोषित करण्यात आले.समुद्र किनाऱ्यावर फेरफटका मारताना सुचनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहेत.