जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

पोलीस आणि डॉक्टरांनी माणूसकी धर्म जपल्याने मिळाले एका मजुराला जीवनदान

1 min read

नांदेड: (प्रतिनिधी)-समाजामध्ये आरोग्य आणि सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस आणि डॉक्टर हा महत्वाचा दुवा असतो. केवळ समाजभान डोळ्यासमोर ठेवून न्याय आणि जीवनदान देण्याचे कार्य ते करत असतात. अशाच एका घटनेत डॉक्टरांनी एका मजुराचा मनगटापासून वेगळा झालेला हाताचा पंजा शस्त्रक्रियेने जोडून जीवनदान दिले आहे. या प्रकरणात पोलिसांची भूमिका देखील महत्वाची ठरली असून खाकी वर्दीतही माणुसकी असते, हे पोलिसांनी दाखवून दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्रिशरण कैलास थोरात (३७) असे जीवदान मिळालेल्या तरुणाचे नाव असून भाग्यनगरच्या पोलीस ठाणे हद्दीत दिनांक २० जुलै रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास नांदेड शहरात मारहाणीची घटना घडली होती. त्रिशरण कैलास थोरातवर सुरज संजय बसवंते, आकाश भागोराव रणमले आणि विनय राम जाधव या तीन युवकांनी तलवारीने वार करून गंभीर जखमी केले होते. या जीवघेणं हल्ल्यात त्रिशरण थोरातचा डाव्या हाताचा मनगटापासूनचा भाग वेगळा झाला होता. घटनेनंतर त्रिशरण कैलास थोरात हा तीन तास जखमी अवस्थेत पडून होता. भाग्यनगर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक बोलावा यांनी घटनास्थळी धाव घेतली. कर्तव्यापेक्षा माणुसकी मोठी असते, हे दाखवत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मजूर त्रिशरण यास स्वत:च्या गाडीत उपचारासाठी पाठवले होते. पंचनामा करुन आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान जखमी हा घरातील कर्ताधर्ता व्यक्ती असून मोलमजूरी करुन तो उदरनिर्वाह करायचा. ही बाब पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकटे, अतिरिक्त पोलिस अधिक्षक अभिनाश कुमार यांना समजली. त्यानंतर त्यांनी जखमीचा हात जोडण्यासाठी त्याला विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात नेण्याचे आदेश पोलीस कर्मचाऱ्यांना दिले. पोलीस जखमीला घेऊन रुग्णालयात पोहचले. त्याच्या हाताचा पंजा कॅरीबॅगमध्ये घालून नेण्यात आला होता. परंतू तेथील डॉक्टरांनी ऑपरेशन होणार नसल्याचे सांगितले. त्यावर पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सुरूवातीला छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) आणि मुंबई येथील डॉक्टरांशी संवाद साधला. मात्र तिथं ही त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर नांदेडचे अस्थिरोग तज्ञ डॉ. देवेंद्रसिंह पालीवाल यांच्यासोबत संवाद साधला. त्याच रात्री डॉ. पालीवाल यांनी ८ तास शस्त्रक्रिया करून जखमी त्रिशरणचा हात जोडला आहे. आज त्याच्या डाव्या हाताच्या बोटांची हालचाल होत आहे. विशेष म्हणजे या शस्त्रक्रियेसाठी तीन ते चार लाख रुपये खर्च संभावित होता. मात्र जखमी युवक गरीब आणि मोलमजुरी करणारा असल्याने डॉ. देवेंद्रसिंह पालीवाल यांनी माणुसकी दाखवत पैसे घेतले नाहीत. पोलिसांनी केलेली मदत आणि डॉक्टरांनी जीवनदान दिल्याने तरुणाने आभार मानले आहे.

Copyright © All rights reserved. | www.beedsamratnews.com Designed by www.WizInfotech.com.