जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

३४ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी २०२३ मध्ये सोडले अर्धवट शिक्षण

1 min read

नवी दिल्ली: (वृत्तसंस्था)- चालू वर्षात देशातील विविध उच्च शिक्षण संस्थांमधून सुमारे ३४ हजार विद्यार्थ्यांनी आपले उच्च शिक्षण अर्धवट सोडल्याचे राज्यसभेत सांगण्यात आले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने बुधवारी राज्यसभेत ही माहिती जाहीर केली. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, तब्बल ३४ हजार ३५ विद्यार्थ्यांनी देशभरातील विविध उच्च दर्जाच्या उच्च शिक्षण संस्थांमधून शिक्षण सोडले आहे. यात इतर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे (ओबीसी) २५ % सह सर्वाधिक असल्याचे सांगण्यात आले आहे. या पाठोपाठ, अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) मधील विद्यार्थ्यांचा क्रमांक लागतो. पदव्युत्तर आणि पीएचडी कार्यक्रमांमध्ये अर्धवट शिक्षण सोडणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांद्वारे कामाच्या मिळणाऱ्या विविध संधी आणि इतर चांगल्या संधींसाठी विद्यार्थी आपला अभ्यास मधूनच सोडतात हे सर्वात मोठे कारण आहे. शिवाय, न जमणारा अभ्यास, विविध वैयक्तिक आणि अनेक वैद्यकीय कारणांमुळेही बहुतेक विद्यार्थ्यांनी त्यांचे पदवीचे शिक्षण सोडले आहे .

राज्यमंत्री सुभाष सरकार यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. शिवाय, यासंदर्भातील विविध कारणांवरही त्यांनी प्रकाश टाकला असून राज्यमंत्री सुभाष सरकार यांनी राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार, आपले शिक्षण अर्धवट सोडणाऱ्या विद्यार्थ्यांचे (गळतीचे) प्रमाण कमी करण्यासाठी संस्थांनी अनेक सकारात्मक सुधारणा केल्या आहेत.

यामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाढीवर लक्ष ठेवण्यासाठी समुपदेशकांची नियुक्ती, शैक्षणिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त वर्गांची तरतूद, विद्यार्थ्यांना तणावमुक्त करणारे समुपदेशन, मानसिक प्रेरणा इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) सारख्या प्रमुख तांत्रिक संस्थांमध्ये २०१९ ते २०२३ या कालावधीत एकूण ८ हजार १९३ विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण अपूर्ण अवस्थेत सोडून दिले. तर २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात कोरोनामुळे शाळा बंद होत्या या कारणामुळे यावर्षात शाळा सोडणाऱ्यांची संख्या सर्वाधिक होती. २०२१ मध्ये गळती झालेल्यांची संख्या २ हजार ४११ एवढी होती, तर २०२० मध्ये ती २ हजार १५२ एवढी झाली. हा आकडा २०२२ मध्ये १ हजार ७४६ यावर्षी (जूनपर्यंत) ३२० होता.
तर, कोविडपूर्व वर्षात १ हजार ५१० विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडले होते. स्वातंत्र्यप्राप्तीपासून भारतामध्ये शैक्षणिक गळती (Educational Dropout) ही मोठी समस्या आहे. तथापि, हे कमी करण्यासाठी, सरकारकडून वेळोवेळी विविध पावले उचलली गेली आहेत, तरीही गळती ही एक मोठी समस्या आहे याचे निवारण करण्याकरिता सरकारकडून अनेक उपाय योजना कार्यान्वित आहेत.