जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

जादूचा आरसा विकणाऱ्यांना अखेर पोलिसांनी पकडलेच

1 min read

जादूचा आरसा असल्याचे सांगून कानपूर येथील एका ७२ वर्षीय वृद्धाला तिघांनी मिळून ९ लाखांला फसविले आहे. सदरील वृद्धाने भुवनेश्वरच्या नयापल्ली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती . दरम्यान पोलिसांनी तिन्ही आरोपींना बंगालमध्ये अटक केली आहे.

लखनऊ: (वृत्तसंस्था)
जादूई आरसाच्या नावाखाली कानपूरमधील वृद्धाची फसवणूक करणाऱ्या तिघांना पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली आहे. ७२ वर्षांच्या अविनाश कुमार शुक्ला यांना तिघांनी ९ लाख रुपयांना जादूचा आरसा विकला होता .

या आरशात लोकांना नग्न दाखवण्याची, त्यांचं भविष्य सांगण्याची जादू असल्याची बतावणी तिघांनी केली होती.
उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये राहणाऱ्या अविनाश कुमार यांना आरोपींनी भुवनेश्वरला बोलावून गंडा घातला आहे. या चावट वृद्धानं भुवनेश्वरच्या नयापल्ली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती . त्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांच्याकडे अनेक आक्षेपार्ह वस्तू सापडल्या आहेत. जादूई आरशाची वैशिष्ट्यं सांगणारा व्हिडीओदेखील त्यांच्याकडे सापडला आहे. याच व्हिडीओच्या आधारे आरोपी लोकांना गंडा घालायचे. अविनाश कुमार त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून जादुई आरशाच्या दावा करणाऱ्यांच्या संपर्कात आले.

बंगालचे रहिवासी असलेल्या पार्थ सिंघराय, मलय सरकार आणि सुदीप्त सिन्हा राय यांनी जादुई आरसाचा दावा करत अविनाश यांना गंडवलं. त्यांच्या जाळ्यात अविनाश अगदी अलगद अडकले. तिघांनी व्हिडीओच्या माध्यमातून अविनाश यांना आरशाची वैशिष्ट्ये सांगितली. या आरशाच्या माध्यमातून लोकांना नग्न पाहू शकतो, असे तिघांनी अविनाश यांना सांगितले होते. आरसा विकणाऱ्यांनी आपण सिंगापूरच्या एका कंपनीत कार्यरत असल्याचे सांगितले. आमच्या कंपनीकडे पुरातनवस्तूंचा संग्रह आहे. आमच्याकडे जादूचा आरसा आहे. त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये आहे. त्याचा वापर नासाच्या शास्त्रज्ञांनी केला होता.

अविनाश यांनी विश्वास ठेवला आणि आरसा घेण्यासाठी भुवनेश्वरला पोहोचले. भुवनेश्वरच्या एका हॉटेलात अविनाश यांची मुलाखत आरसा विकायला आलेल्या तिघांशी झाली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येईपर्यंत त्यांच्या हातून ९ लाख रुपये गेले होते. त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी तातडीने चक्रे फिरवली आणि तिघांना बेड्या ठोकल्या. नयापुल्ली पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक विश्वरंजन साहू यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन आरोपींनी अविनाश यांना हॉटेलमध्ये बोलावलं. त्यांनी तक्रारदाराकडून ९ लाख घेतले. त्यावेळी अविनाश यांना शंका आली. मात्र आरोपी पैसे घेऊन फरार झाले.

त्यांच्याकडून अनेक वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. त्यात एक कार, २८ हजारांची रोख रक्कम, ५ मोबाईल, मॅजिक मिररची वैशिष्ट्ये दाखवणारा व्हिडीओ आणि संशयास्पद कागदपत्रांचा समावेश असून अधिक तपास संबंधित पोलीस करीत आहेत.

Copyright © All rights reserved. | www.beedsamratnews.com Designed by www.WizInfotech.com.