जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

ट्रॅक्टर- ट्राॅली नदीत उलटून झालेल्या अपघातात ; ९ जण ठार तर २० हून अधिक जखमी

1 min read

सहारनपूर: (वृत्तसंस्था)- उत्तर प्रदेश राज्यातील सहारनपूरमध्ये भाविकांनी भरलेली ट्रॅक्‍टर-ट्रॉली नदीत उलटून झालेल्या अपघातात मृतांची संख्या ९ झाली आहे. तर, अद्याप एक १५ वर्षांचा मुलगा बेपत्ता आहे. बचाव पथक सतत बचावकार्यात गुंतलेले आहे. या घटनेत एकाच गावातील ९ जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सर्व मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. तर, बेपत्ता असलेल्या मुलाचा शोध सुरू आहे.

एका धार्मिक कार्यक्रमाला जाण्यापूर्वी हे भाविक सहारनपूरच्या देहत कोतवाली भागात आपल्या नातेवाईकांना भेटायला गेले होते. जनता रोडवरील बुणकी गावाजवळ धामोळा नदीत त्यांची ट्रॅक्टर-ट्रॉली उलटली. या अपघातातील मृतांची संख्या आता ९ वर पोहोचली आहे. सौरभ नावाचा १५ वर्षांचा मुलगा अद्याप बेपत्ता असल्याची माहिती आहे. बचाव पथकही त्याचा शोध घेत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गागलखेडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बलाहेडी गावातून राजस्थानच्या तीर्थक्षेत्री बगाडला जाण्यापूर्वी गावकरी ट्रॅक्टर-ट्रॉलीत बसून नातेवाईकांच्या भेटीसाठी जनता रोडवरील रंडौल गावात जात होते. देहात कोतवाली परिसरातील बुंदकी गावाजवळ आले असता पावसामुळे नदीच्या वाहत्या पाण्यात ट्रॅक्टर-ट्रॉली अनियंत्रित होऊन उलटली.

त्यावेळी ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये सुमारे ४० भाविक होते. ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी होताच हाहाकार माजला. आजूबाजूचे ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले आणि पोलिस प्रशासनाला घटनेची माहिती देण्यात आली. ग्रामस्थांनीही आपापल्या स्तरावर बचावकार्य सुरू केले. पोलिसांना कळवण्याबरोबरच ट्रॅक्टर-ट्रॉलीखाली दबल्या गेलेल्या भाविकांना गावकऱ्यांनी बाहेर काढले. या अपघाताची माहिती मिळताच जिल्हा दंडाधिकारी डॉ. दिनेश चंद्र, एसएसपी डॉ. विपिन टाडा, एसपी सिटी अभिमन्यू मांगलिक मय फोर्स घटनास्थळी पोहोचले.

पोलिसांनी जखमींना बाहेर काढले. या अपघातात बलाहेडी येथील रहिवासी मंगलेश (५५), त्यांची नात अदिती (३), टीना (१३), सुलोचना (५८) यांचा जागीच मृत्यू झाला. बचाव पथकाने नदीतून नितीश (७), किरण (३०), एकता (१४), कामिनी (८) आणि अक्षय (२२) यांचे मृतदेह बाहेर काढले. या अपघातात सेठपाल आणि मंगेराम यांच्यासह २० हून अधिक भाविक जखमी झाले आहेत. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Copyright © All rights reserved. | www.beedsamratnews.com Designed by www.WizInfotech.com.