लडाखमध्ये दुर्दैवी घटना ; लष्कराचे वाहन दरीत कोसळल्याने नऊ जवान शहीद
1 min readलडाखमधील क्यारी शहरापासून ७ किलोमीटर अंतरावर शनिवारी सायंकाळी लष्करी वाहन दरीत कोसळल्याने झालेल्या दुर्दैवी अपघातात ९ जवान शहीद झाले असून काही जवान जखमी देखील असल्याचे समजते. शहीदांमध्ये एक ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसरचा ही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
लडाख : केंद्र शासित प्रदेश लडाखमध्ये शनिवारी सायंकाळच्या सुमारास भारतीय लष्कराचे वाहन दरीत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. क्यारी शहरापासून ७ किलोमीटर अंतरावर झालेल्या या अपघातात ९ जवान शहीद झाले असून काही जवान जखमी झाल्याची माहिती आहे .
शहीद झालेल्या जवानांमध्ये एक ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसरचाही समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय जवान कारू गॅरिसनपासून लेहजवळील क्यारी शहराकडे जात होते. मात्र सायंकाळच्या सुमारास क्यारी शहराजवळ असताना जवानांचे वाहन दरीत कोसळले. या वाहनातून १० पेक्षा अधिक जवान प्रवास करत होते. खोल दरीत वाहन कोसळल्याने गंभीर जखमी झालेल्या ९ जवानांनी जागीच प्राण गमावले, तर अन्य काही जवानांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संरक्षण मंत्र्यांकडून शोक व्यक्त करण्यात आले आहे.
लष्करातील जवानांसोबत घडलेल्या या दुर्घटनेनंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. सिंह यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, ‘लडाखमध्ये लेहजवळ झालेल्या भारतीय जवानांच्या मृत्यूने मी दु:खी झालो आहे. देशाप्रती त्यांनी दिलेले योगदान कोणीही विसरणार नाही. शहीद जवानांच्या कुटुंबाप्रती माझ्या सहवेदना आहेत. जखमी जवानांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी, यासाठी प्रार्थना करत आहे,’ अशा शब्दांत राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला आहे.