जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

20 January 2025

ख्यातनाम उद्योगपती रतन टाटा यांचं निधन ; वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

1 min read

मुंबई: (वृत्तसंस्था )- भारतातच नव्हे जगभरात ख्यातनाम असलेले उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झाले आहे. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. टाटा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं वृत्त सोमवारी आलं होतं. त्यानंतर रतन टाटांनीच त्यांच्या प्रकृतीबद्दलची माहिती दिली होती. वाढत्या वयामुळे नियमित वैद्यकीय तपासणी होत असल्याचे टाटांकडून सांगण्यात आले होते. आज संध्याकाळी त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आलं. त्यानंतर त्यांच्यासाठी देशभरातून प्रार्थना सुरु होत्या. आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. काही वेळापूर्वी त्यांची प्राणज्योत मालवली.

रतन टाटा यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. बुधवारी संध्याकाळी त्यांची प्रकृती बिघडली. काही वेळातच त्यांनी जगाचा निरोप घेतला. रतन टाटांच्या निधनाने देश शोकसागरात लोटला गेला आहे.

टाटा रुग्णालयात गेले असल्याचं वृत्त सोमवारी आल्यानंतर अनेकांनी चिंता व्यक्त केली. अनेकांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केल्या. आज संध्याकाळी त्यांची प्रकृती नाजूक असल्याचे वृत्त आलं होतं. त्यानंतरही देशभरातून प्रार्थना सुरु झाल्या. टाटांनी देशासाठी दिलेलं योगदान मोलाचे आहे.

संवेदनशीलपणा कायम जपणारा, सढळ हस्तानं मदत करणारा उद्योगपती अशी रतन टाटांची ओळख होती. आयुष्यभर त्यांनी ती जपली. त्यांचा साधेपणा अनेकांसाठी कुतूहलाचा विषय राहिला. टाटा आयुष्यभर साधेपणानं जगले. टाटा समूहानं कोणताही उद्योग सुरु करतांना आधी देशाचा विचार केला. देशाच्या गरजा लक्षात घेऊन त्यांनी अनेक उद्योग सुरु केले. समूहाची ही परंपरा टाटांनी कायम ठेवली. उच्च नैतिक मूल्य जपण्याचं काम त्यांनी केले. संकटाच्या काळात त्यांनी देशाला कायम साथ दिली. कोणत्याही अडचणीत ते ठामपणे, निर्धाराने उभे राहिले. त्यामुळे ते देशाचे लाडके झाले.

रतन टाटांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी झाला. १९९१ ते २०१२ या कालावधीत ते टाटा समूहाचे चेअरमन राहिले. टाटा समूहाला वेगळ्या उंचीवर नेण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. काळाची पावले ओळखून त्यांनी टीसीएस कंपनी सुरु केली. टाटा समूहाच्या एकूण महसुलात या कंपनीचा सिंहाचा वाटा आहे. टाटांनी दूरदृष्टी ठेवून घेतलेले निर्णय टाटा समूहासाठी फायदेशीर ठरले. समूहाची घोडदौड सुरु ठेवतांना टाटांनी कायमच उच्च कोटीची नैतिक मूल्यं जपली.

टाटा यांनी १९९६ मध्ये दूरसंचार कंपनी टाटा टेलिसर्व्हिसेसची स्थापना केली आणि २००४ मध्ये आयटी क्षेत्रातील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ही कंपनी सार्वजनिक केली.

२००९ मध्ये, रतन टाटा यांनी मध्यमवर्गीयांसाठी जगातील सर्वात स्वस्त कार उपलब्ध करून देण्याचे वचन पूर्ण केले. मात्र १ लाख किंमतीची टाटा नॅनो ही मध्यमर्गीयांसाठीची कार त्यांनी बाजारात आणली होती.

रतन टाटा हे टाटा समूहाचे १९९१ ते २०१२ आणि २०१६ ते २०१७ या काळात दोनदा अध्यक्ष होते. त्यांनी कंपनीच्या दैनंदिन कामकाजातून माघार घेतली असली तरी, त्यांनी चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख म्हणून काम चालू ठेवले.

टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की

“टाटा समूहासाठी रतन टाटा हे एका अध्यक्षापेक्षा अधिक होते. माझ्यासाठी ते एक मार्गदर्शक आणि मित्र होते. त्यांनी स्वतःच उदाहरण जगासमोर ठेवून इतरांना प्रेरणा दिली. त्यांच्या नेतृत्वात टाटा समूहाने नेहमी उत्कृष्टता, सचोटी आणि नाविन्यपूर्णतेसाठी वचनबद्धता दाखवली. समूहाच्या नैतिकतेशी कुठेही तडजोड न करता टाटा समूहाने जागतिक स्तरावर ठसा उमटवला आहे.”

रतन टाटांनी केलेल्यासमाजसेवेची दखल या निवेदनात घेण्यात आली आहे, त्यात म्हटलं आहे की, “शिक्षणापासून ते आरोग्यसेवेपर्यंत, त्यांच्या पुढाकारांनी खोलवर रुजलेली छाप सोडली आहे ज्याचा फायदा येणाऱ्या पिढ्यांना होईल”.