जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

मुंबईत बाबा सिद्दिकी यांची गोळ्या घालून हत्या ; महाराष्ट्रात शासन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

1 min read

मुंबई: (वृत्तसंस्था)- काॅंग्रेस पक्षांत खूप काळ राहिलेले व सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत शनिवारी (१२ ऑक्टोबर) रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्यांना जखमी अवस्थेत लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी खेरवाडी सिग्नलजवळ आमदार झीशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाकडे जात असताना त्यांच्यावर तीन अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला ज्यात त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी निर्मल नगर पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. यातील एक आरोपी हरियाणा तर दुसरा आरोपी हा उत्तर प्रदेश इथला असल्याची माहिती आहे. मुंबई क्राईम ब्रांचकडून घटनेचा तपास केला जात आहे. दरम्यान, सिद्दिकी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात नेण्यात आला आहे.

बाबा सिद्दिकी हे गेली तीन ते चार दशकं राजकारणात सक्रिय होते. राजकीय आयुष्यातील बहुतांश काळ ते काँग्रेस पक्षात होते. काही महिन्यांपूर्वीच ते अजित पवारांच्या गटात गेले होते.

बाबा सिद्दिकी यांचं हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांशी जवळचे संबंध होते. त्यामुळे सुद्धा ते चर्चेत असत. बाबा सिद्दिकी यांनी काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केला होता.

गोळ्या झाडण्यापूर्वी फुटले फटाके

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार सिद्दिकी यांच्यावर एकूण ५ गोळ्या झाडण्यात आल्या. त्यापैकी तीन गोळ्या त्यांना लागल्या. त्यातली एक गोळी त्यांच्या छातीजवळ लागल्याची माहिती आहे.

सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडण्यापूर्वी त्याठिकाणी फटाके फोडण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या, अशीही माहिती मिळाली आहे.

बाबा सिद्दिकी यांना १०-१५ दिवसांपूर्वी धमकी मिळाली होती, अशीही माहिती मिळाली आहे. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. सिद्दिकी यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आलेली होती.
सध्या आरोपींची चौकशी सुरू असून पोलिसांकडून काहीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

बाबा सिद्दिकी यांचा राजकीय प्रवास

बाबा सिद्दिकी यांचा जन्म ३० सप्टेंबर १९५८ला झाला. त्यांचं शिक्षण बीकॉम पर्यंत झालेले आहे. सिद्दिकी यांनी वयाच्या १६-१७ व्या वर्षापासून कॉंग्रेस पक्षात काम करण्यास सुरूवात केली.

बाबाज ऑर्गनायझेशन ऑफ सोशल सर्व्हीसेसमध्ये ते काम करू लागले.

त्यानंतर ते मुंबई प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सदस्य बनले. १९९९ साली बाबा सिद्दिकी यांनी वांद्रे पश्चिममधून विधानसभा निवडणूक लढवली. तेंव्हा ते पहील्यांदा विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर २०१४ पर्यंत विधानसभेवर ते सलग निवडून आले. नोहेंबर २००४ते डिसेंबर २००८या काळात कामगार , अन्न नागरी पुरवठा आणि अन्न व औषध प्रशासनाचे ते राज्यमंत्री होते. २०१४साली बाबा सिद्दिकी यांचा भाजपच्या आशिष शेलार यांनी पराभव केला.

२०१९च्या विधानसभा निवडणुकीसाठी बाबा सिद्दिकी यांनी वांद्रे पश्चिमचा मतदारसंघ सोडून वांद्रे पूर्वमधून तयारी करायला सुरूवात केली. वांद्रे पूर्वमध्ये शिवसेनेचे बाळा सावंत हे आमदार होते. त्यांचं २०१५ साली निधन झाले.
पोटनिवडणुकीत कॉंग्रेसकडून नारायण राणेंचा पराभव करत बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत निवडून आल्या. त्यानंतर बाबा सिद्दिकी मतदारसंघापलिकडे राजकीयदृष्ट्या फारसे सक्रीय दिसत नव्हते.
२०१९ च्या निवडणुकीसाठी वांद्रे पूर्वचा मतदारसंघ त्यांनी बांधला. पण बाबा सिद्दिकी यांनी निवडणूक न लढवता त्यांचा मुलगा झिशान सिद्दिकी याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले.

शिवसेनेकडून विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण नाराज तृप्ती सावंत यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

मतांच्या विभाजनामुळे आणि शिवसेनेच्या अंतर्गत वादामुळे झिशान सिद्दिकी शिवसेनेच्या विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव करत जिंकून आले. त्यावेळी शिवसेनेच्या बालेकिल्यात आणि मातोश्रीच्या दारात कॉंग्रेसने पराभव केल्यामुळे या लढतीची जोरदार चर्चा झाली होती.

काही महिन्यांपूर्वी बाबा सिद्दिकी यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देत अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.

बाबा सिद्दिकी यांचं बॉलीवूड कनेक्शन

बाबा सिद्दिकी हे १५ वर्षं वांद्रे पश्चिमचे आमदार राहिले आहेत. वांद्र्यांच्या या भागात अनेक बॉलीवूड अभिनेते राहतात. दरवर्षी रमझान महिन्यात बाबा सिद्दिकी यांची इफ्तार पार्टी ही चर्चेत असते. त्या पार्टीला राजकीय नेत्यांबरोबर निम्म बॉलीवूड हजेरी लावतं.
काही वर्षांपूर्वी अभिनेत्री कॅटरिना कैफच्या वाढदिवसाच्या पार्टीत अभिनेता शाहरूख खान आणि सलमान खान यांच्यात जोरदार वाद झाला.
त्यानंतर काही वर्षं ते एकमेकांशी बोलत नव्हते. पण बाबा सिद्दिकी यांच्या इफ्तार पार्टीत त्यांनी दोघांना एकत्र आणलं. यावेळी या दोन्ही सुपरस्टारमध्ये समेट झाली होती. त्यावेळी बाबा सिद्दिकी यांच्या इफ्तार पार्टीची जोरदार चर्चा रंगली होती.