जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

मराठवाड्यातून सर्वाधिक बीड जिल्ह्यातील ९८ शेतक-यांची आत्महत्या

1 min read

बीड: ( प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या उपाय योजना निष्क्रिय ठरत असून विविध कारणांनी शेतकरी मात्र हतबल होऊन आत्महत्या करीत आहे. शासनाच्यावतीने करण्यात आलेल्या नुसत्या घोषणा आणि अवकाळी पाऊस, शेतीचे नुकसान, आर्थिक विवंचना या गर्तेत अडकलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारस्तरावर अनेक प्रयत्न केले जात असल्याचे दावे अजूनही फोल ठरत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या पाच महिन्यांत मराठवाड्यातून ३९१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असल्याचे विभागीय आयुक्तालयाच्या अहवालात उघड होत आहे. त्यांतच आता पावसाने ओढ दिल्याने सरकारी यंत्रणा आणि राज्य सरकारसमोर आत्महत्या सत्र रोखण्याचे मोठे आव्हान उभे राहणार आहे.
महाराष्ट्र राज्याच्या विभागीय आयुक्तालयातून प्राप्त अधिकृत आकडेवारीनुसार, १ जानेवारी ते ३१ मे २०२३ या पाच महिन्यांत मराठवाड्यात ३१९ शेतकर्यांनी आत्महत्या केली आहेत. त्यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक ९८, त्या नंतर धाराशीव जिल्ह्यातील ८० शेतकऱ्यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात अतिवृष्टीचा फटका बसला होता. त्यामुळे निम्म्याहून अधिक मराठवाड्यात खरिपाचे पीक हातून गेले होते. काही ठिकाणी दुबार पेरणी केल्यानंतर जास्तीच्या पावसाचा फटका बसला होता. सरकारने शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली. मात्र, अजून दोन वर्षांपूर्वीच्या नुकसानीचीच भरपाई रक्कम अनेक शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत मिळालेली नाही. त्यातच गेल्या वर्षीच्या शेती नुकसानीची भर पडली. विमा कंपन्यांकडूनही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
शेतकऱ्यांना मे अखेरपर्यंत वीकविम्याचे पैसे मिळतात. मात्र यंदा शेतकरी त्यापासून वंचित असून त्यात अवकाळी व गारपिटीमुळे रबी हंगामातील पिकांनाही मोठा फटका बसला होता. हातातोंडाशी आलेली पिके गारपिटीने उद्ध्वस्त झाली. कापसाला भाव मिळाला नाही. एकूणच मराठवाड्यातील शेतकरी अडचणीच्या कोंडीत सापडला आहे. सरकारकडून केले जाणारे प्रयत्न अपुरे पडत असल्याची भावना देखील व्यक्त केली जात आहे.
राज्य शासनाकडून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या वारसाला सानुग्रह अनुदानापोटी एक लाखाची मदत करण्यात येते. मराठवाड्यातील २३६ शेतकरी सरकारच्या या निकषात बसत असल्याने या शेतकऱ्यांच्या वारसांना अनुदानाची रक्कम प्रदान करण्यात आली. सुमारे ५७ शेतकऱ्यांच्या वारसांना मात्र निकषात बसत नसल्याने मदत करण्यास शासनाने नकार दिला आहे. ९८ प्रकरणांची चौकशी महसूल व पोलिस विभागाकडून सुरू असल्याचे विभागीय आयुक्तालयातील सूत्रांनी सांगितले. आत्महत्या करणाऱ्या जिल्ह्यांत सर्वाधिक बीड जिल्ह्यातील शेतकरी आहेत मागील पाच महिन्यांत बीड जिल्ह्यामध्ये ९८ शेतक-यांनी आत्महत्या केली असल्याचे विभागीय आयुक्तालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार स्पष्ट होत आहे दरम्यान मराठवाड्यातील
छत्रपती संभाजीनगर, (औरंगाबाद)५० जालना ,२५ परभणी ,३२ हिंगोली १३ नांदेड,६५ लातूर ,२८ तर धाराशिव जिल्ह्यात ८० शेतक-यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट होत आहेत.

Copyright © All rights reserved. | www.beedsamratnews.com Designed by www.WizInfotech.com.