जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

तेंव्हा कथक नृत्य शिकण्यासाठी माझ्या वडिलांनी परवानगी दिली नव्हती- अमृता खानविलकर

1 min read

मुंबई: (वृत्तसंस्था)- मराठी सिनेइंडस्ट्रीतल्या प्रसिद्ध डान्सिंग स्टारपैकी एक असलेल्या अमृता खानविलकरच्या डान्सचे चाहते कमी नाहीत. तिच्या लावण्या असो किंवा रिॲलिटी शोमधले सादरीकरण..नेहमीच प्रेक्षकांना आवडले आहे. अमृताला डान्स शिकण्याासाठी सुरुवातीला तिच्या वडिलांनी परवानगी दिली नव्हती. मराठीसह हिंदी मनोरंजनविश्वात नाव कमावलेल्या अभिनेत्रींमध्ये आवर्जून घेण्यासारखं नाव म्हणजे अमृता खानविलकर. तिने आजवर अनेक सुपरहिट कलाकृतींमधून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अभिनेत्रीसह ती एक उत्तम नृत्यांगनादेखील असल्यामुळे तिने सादर केलेल्या अनेक लावण्या आजही लोकप्रिय आहेत. पण तिचे नृत्याशी असलेलं नातं फक्त लावणीपुरतंच मर्यादित नाही. नुकतच तिनं नॅशनल सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्समध्ये पहिल्यांदाच कथक नृत्य सादरीकरण केले .शुभदा वराडकर यांनी क्युरेट केलेल्या ‘राम रतन धन’ कार्यक्रमात अमृताने कथक नृत्य सादर केले. या अनुभवाबद्दल तिने सांगितले, ‘अतिशय अविस्मरणीय अनुभव मला यानिमित्ताने मिळाला. मी आतापर्यंत केलेल्या इतक्या नृत्य सादरीकरणापेक्षा हा खूप वेगळा अनुभव होता. कलेवर प्रेम करणाऱ्या रसिक प्रेक्षकांसमोर कथक नृत्य सादर करणे म्हणजे एक सुंदर अनुभव होता आणि माझ्यासाठी एक पर्वणीच.’ अमृताने कथक शास्त्रोक्त प्रशिक्षण घेतले नसले तरीही तिचे कथकशी जुने आणि जवळचे नाते असल्याचे ती म्हणाली. काही जुन्या आठवणींना तिने उजाळा दिला. ‘माझ्या बहिणीचे कथक सादरीकरणाचा कार्यक्रम मी बघायला गेले होते आणि मलाही कथक शिकायची इच्छा मी माझ्या घरी व्यक्त केली; पण त्यावेळी माझ्या वडिलांनी त्यासाठी परवानगी दिली नाही. पुढे मनोरंजनविश्वात काम करताना मी अनेक नृत्य सादर केले; पण कथक फारसे कधी केले नाही. आता कथक नृत्याचा वारसा आणि परंपरा पुढे घेऊन जाण्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन. त्या दिशेनं पावलं टाकायला मी सुरुवात केली आहे’, असं ती म्हणाली.’ मोहे पनघट पे’ या गाण्यावर अमृता आणि ७५ इतर शास्त्रीय नर्तकांनी केलेल्या कथक सादरीकरणाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. प्रिया देव हिनं त्या नृत्याची कोरिओग्राफी केली आहे. ‘मी कथकचं प्रशिक्षण घेतलं नाहीय हे मला कोणी जाणवू दिलं नाही. सगळ्यांनी मला सांभाळून घेतले. प्रियाने चांगल्या प्रकारे मला शिकवले,
अशा भावना अमृताने व्यक्त केल्या. ओडिसी, भरतनाट्यम, कथक, मणिपुरी अशा सगळ्या नृत्यशैलीतील दिग्गजांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगला. ‘गेल्या सहा महिन्यात कथक शिकण्यासाठी मला प्रोत्साहित करणारे गुरू भेटले. भारतातील नृत्य संस्कृती जपण्यासाठी मी कायम प्रयत्नशील असेन’, असे ती म्हणाली.अमृताताईचा नम्रपणा आणि शिकावू वृत्ती यामुळे तिला नृत्य शिकवताना मलासुद्धा नवनवीन प्रयोग करता आले. तीदेखील ते पटकन शिकली. कलेशी असलेला तिचा प्रामाणिकपणा आणि परफेक्शन या दोन गोष्टी तिच्याकडून आत्मसात करायला मला नक्की आवडतील. तिनं केलेलं नृत्य प्रेक्षकांना भावलं हीच माझ्या कामाची पोचपावती आहे. यानिमित्ताने शास्त्रीय नृत्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचतंय आणि मी त्याचा एक छोटा भाग आहे याचा आनंद आहे. अशी भावना प्रसिद्ध कथक नृत्यांगना प्रिया देव हिने व्यक्त केली.

Copyright © All rights reserved. | www.beedsamratnews.com Designed by www.WizInfotech.com.