अमृता खानविलकरच्या मस्त अदा ! छोट्या पडद्यावर परतणार ‘चंद्रमुखी’
1 min read
मुंबई : (वृत्तसंस्था) रुपेरी पडद्यावरील 'चंद्रमुखी' अर्थात अभिनेत्री अमृता खानविलकर हिने २०२४ या वर्षाची सुरुवात अतिशय दमदार केली असून तिचे एका मागोमाग एक कमालीचे प्रोजेक्ट्स प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 'लुटेरे' , 'चाचा विधायक है ' हमारे ३', '३६ डेज' अशा हिंदी प्रोजेक्टमध्ये ती झळकली होती.
आता अभिनेत्री छोट्या पडद्यावर परतणार असून ती झी मराठीच्या आगामी कार्यक्रमात झळकणार आहे.
ती बॅक टू बॅक वेगवेगळ्या रूपात प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आहे आणि आता तिने नव्या कार्यक्रमाची झलक दाखवणारे रील शेअर केली आहे.
अमृता आता नक्की काय करणार आहे?
ती मालिका करणार का ? ती एका रिॲलिटी शोमध्ये दिसणार की आणखी कोणता कार्यक्रम असेल? असे अनेक सवाल प्रेक्षकांना पडले आहेत.
हिंदी वेब सीरिज, चित्रपट आणि आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर अमृता प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून याबद्दल ती देखील खूप उत्सुक आहे.
नव्या प्रोजेक्टबद्दलचे रील सोशल मीडियावर शेअर करतांना अमृताने असे लिहिले आहे. की,
'नव्या रंगात नव्या ढंगात... कमिंग सून!'
तिच्या या पोस्टाने प्रेक्षकांची उत्कंठा अधिकच वाढली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी झी मराठीने शेअर केलेल्या प्रोमो दरम्यानचे क्षण अभिनेत्रीने या लेटेस्ट रीलमध्ये पोस्ट केले आहेत. अमृता आणि अभिनेता संकर्षण कऱ्हाडेचं अपहरण झाल्याची ब्रेकिंग न्यूज या झी मराठीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आली होती. ‘दोन नामवंत कलाकारांचं अपहरण, कोणी घडवून आणलं हे सारं… लवकरच समजणार…’ अशी कॅप्शन देत हा प्रोमो शेअर करण्यात आलेला आहे. ‘ड्रामा ज्युनिअर्स’ या शोमध्ये ही जोडी दिसणार असल्याची चर्चा आहे. झी मराठीकडून अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
अमृताने याआधीही तिच्या विविध प्रोजेक्टबद्दल सोशल मीडियाद्वारे माहिती दिली आहे. आता ती पुन्हा एकदा टीव्हीवर कमबॅक करते आहे.
याशिवाय अभिनेत्री आगामी काळात ‘कलावती’, ‘ललिता बाबर’, ‘पठ्ठे बापूराव’ या सिनेमांमध्येही दिसणार आहे. मराठीमध्ये अलीकडेच तिचा ‘चंद्रमुखी’ सिनेमा तुफान गाजला होता.