जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

13 November 2024

१४१ खासदार निलंबन प्रकरणी तेजस्विनी पंडितची संतप्त प्रतिक्रिया

1 min read

मुंबई: (वृत्तसंस्था) लोकसभेत आणि राज्यसभेत संसदेच्या सुरक्षेचा भंग, कांदा निर्यातबंदी आणि इतर प्रश्नांबाबत विरोधकांनी चर्चेची मागणी केली होती. या विविध मागण्यासाठी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आणखी ४९ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. कथितरित्या आक्षेपार्ह वर्तन केल्याचा ठपका या विरोधकांवर ठेवण्यात आला आहे. अधिवेशनामध्ये निलंबनाचे सत्र सुरुच असल्याने आतापर्यंत विरोधी पक्षांच्या १४१ खासदारांवर कार्यवाही करून निलंबित करण्यात आले आहे. याबाबत देशभरातून प्रतिक्रिया उमटत असून, एक्स आणि फेसबुकसारख्या समाज माध्यमावर प्रतिक्रियांचा पूर आला आहे. दरम्यान यावरुन अभिनेत्री तेजस्विनी पंडितनेही ट्विटर पोस्ट करत ‘लोकशाही बसली धाब्यावर’ असे म्हंटले आहे.

नेमकं काय म्हणाली तेजस्विनी?

तेजस्विनीने तिच्या एक्स (ट्विटर) पोस्टमध्ये असे म्हंटले आहे की,

'चला बिलं पास करुन घ्या पटापट, मेजॉरिटी तर आधीपासून होतीच आता तर विरोध करायला कुणी नाही...!

लोकशाही बसली धाब्यावर! हुकूमशाहीचा उदय की अंताकडे प्रवास?'

अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर करताना

#NoDemocracy #Adhiveshan

असे हॅशटॅगही वापरले आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत, त्यातील काही कमेंटवर अभिनेत्रीने सडेतोड उत्तरही दिले आहे.
लोकसभेत विरोधी पक्षांचे संख्याबळ १३३ आणि राज्यसभेत ९५ इतके आहेत. त्यापैकी लोकसभेतील ९४ खासदारांचे आणि राज्यसभेतील ४६ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत निलंबित झालेल्या खासदारांची संख्या एकूण १४१ इतकी आहे. दरम्यान ससंदेतील विरोधी पक्षांच्या खासदारांची संख्या ही केवळ ८७ एवढी राहिली आहे. लोकसभेत विरोधी पक्षांचे संख्याबळ ३८ तर राज्यसभेत ४९ इतकंच राहिले आहे.
दरम्यान ही पहिलीच वेळ नव्हे जेव्हा तेजस्विनी पंडितने ट्विटरच्या (X) माध्यमातून राजकीय घडामोडीवर भाष्य केले आहे. तिने याआधी राज्यातील टोल प्रश्नासंदर्भात एक पोस्ट केली होती. त्यानंतर ट्विटरवरुन तिचे व्हेरिफिकेशन हटवण्यात आल्याचा आरोप करत तेजस्विनीने परखड मत व्यक्त केले होते. आता अभिनेत्रीने संसदेत विरोधकांच्या निलंबनाविषयी केलेली पोस्ट खूप चर्चेत आली आहे.