जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

रसिकांच्या हृदयातील ध्रुवतारा- महान पार्श्वगायक मो. रफी

1 min read

विशेष लेख: (समीर फारोकी)- ३१ जुलै म्हणजे आवाजाची देणगी लाभलेले पार्श्वगायक मोहम्मद रफी यांची आज पुण्यतिथी. रफीसाहेबांना जाऊन आज ४३ वर्षे झाली. पण त्यांचा आवाज भारतीय संगीत रसिकांच्या कानावर पडला नाही, असा एकही दिवस गेला नाही. गेल्या ४३ वर्षांत अनेकांनी ‘प्रति रफी’ बनण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणालाही रफी साहेबांच्या जवळपासही पोहोचता आलेले नाही, यातच सारे काही आले. रफींनी अजरामर केलेल्या गीतांची यादी अफाट आहे. त्यातून चांगल्या गीतांची निवड करणे अत्यंत कठीण आहे. तरीही आजच्या जयंतीदिनी त्यांना आदरांजली म्हणून ‘ बीड सम्राट पोर्टलच्या वाचकांसाठी त्यांच्या काही निवडक गीतांचा हा नजराणा सादर करीत आहोत…

क्या हुआ तेरा वादा…

‘हम किसी से कम नही’ या चित्रपटातील हे गाणे. रफींच्या आवाजातील या गाण्याने त्यावेळी लोकप्रियतेचे रेकॉर्ड मोडले होते. प्रेमभंग झालेल्या तरुण-तरुणींच्या तोंडावर हमखास हे गाणे असायचं.

बहारों फुल बरसाओ…

१९६६ साली आलेल्या ‘सूरज’ चित्रपटातील हे गाणे. राजेंद्र कुमार व वैजयंतीमाला यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आजही तितकेच फ्रेश वाटतं. हसरत जयपुरींच्या शब्दातील प्रत्येक भावना रफींनी या गाण्यातून अत्यंत अलवारपणे व अचूक उलगडून दाखवली होती.

बाबूल की दुवाएँ लेती जा…

१९६८मध्ये आलेल्या ‘नीलकमल’ या चित्रपटातील हे गीत. राजकुमार, मनोज कुमार, बलराज सहानी, ललिता पवार, शशिकला अशा दिग्गजांच्या अभिनयाने गाजलेला हा चित्रपट. पण तो लक्षात राहिला रफी यांनी गायलेल्या या विरहगीतामुळे. मुलीला सासरी पाठवताना हटकून या गीताची आठवण येते. हे गाणं ऐकून डोळ्यात अश्रू न येणारा बाप विरळाच! रफी साहेब हे गाणं अक्षरश: जगले होते, असे म्हंटले तर अतिशयोक्ती होणार नाही.

ये रेशमी झुल्फे…

सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या ‘दो रास्ते’ या चित्रपटातील हे गीत. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी स्वरसाज चढवलेल्या या गाण्याचे रफींनी अक्षरश: सोनंच केलं होतं. प्रेमात पडलेल्या तरुणांसाठी हे गाणं म्हणजे प्रेयसीला पटवण्याचं एक शस्त्रच झाले होते .

उडे जब जब जुल्फे तेरी…

दिलीप कुमार यांच्या ‘नया दौर’ चित्रपटातील हे गाणे हिंदी चित्रपट संगीतातील नव्या काळाची नांदी ठरलं होतं. हे गाणं गाताना मोहम्मद रफी यांनी शब्दांतील अवखळपणा अचूक व्यक्त केला होता. जितक्या सहजतेने दिलीप कुमार यांनी पडद्यावर ते साकारले, तितक्याच सहजतेने रफी यांनी ते गायले होते. आशा भोसले यांची उत्तम साथ त्यांना लाभली होती.

ओ दुनिया के रखवाले…

गायक म्हणून रफी यांची उंची काय होती, याचा पुरावा म्हणजे ‘बैजू बावरा’मधील हे गाणं. आर्तता, विवशता, व्याकूळता आणि क्रोध भावनेचा अपूर्व संगम या गाण्यात दिसून येतो. रफी साहेबांनी या गीताची सुरुवात व शेवट ज्या पद्धतीने केला आहे, तो हृदय पिळवटून टाकणारा आहे.

हा रुसवा सोड सखे…

मोहम्मद रफी यांनी अनेक भाषांमध्ये गाणी गायली. मराठी चित्रपटांसाठीही त्यांनी गायन केले. त्यांची मराठी गाणी ऐकताना एखादा अमराठी माणूस ती गातोय, असं कुठेही वाटत नाही. ‘ळ’, ‘ज’ अशा अडचणींच्या शब्दांचा उच्चारही त्यांनी काळजीपूर्वक केला आहे.

अच्छा जी मै हारी…

मोहम्मद रफी यांनी अनेक पार्श्वगायिकांसोबत गाणी गायली. या सर्वांशी त्यांचे ट्युनिंग उत्तम जमले. विशेषत: लता मंगेशकर व आशा भोसले यांच्यासोबतची त्यांची गाणी तुफान गाजली. पण या सगळ्यात ‘अच्छा जी मै हारी…’ या गाण्याची मजा काही औरच! मधुबाला व देव आनंद यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं पडद्यावर जितकं ‘बघणेबल’ आहे, तितकंच ते रफी आणि आशाताईंच्या स्वरातील लाडिक व खोडकरपणा मुळे ‘ऐकणेबल’ झाले आहे. असे हजारो अजरामर गाणं रफी यांनी गायलं आहेत .

Copyright © All rights reserved. | www.beedsamratnews.com Designed by www.WizInfotech.com.