जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

अंमली पदार्थांची सवय आणि उद्भवणारे दुष्परिणाम

1 min read

बीड सम्राट:( विशेष लेख)अशात ड्रग्सबद्दलच्या बातम्या आणि चर्चा आपल्या सतत कानावर येत असतात. उत्तेजकं,ओपिऑईड्स, मेफेड्रोन, फेंटानिल असे वेगवेगळे शब्दही कानावर पडत असतात. याचा अर्थ काय ?
या मादक पदार्थांमध्ये असे काय असते, ज्याची सवय लागते?
आणि या सेवनाचे शरीरावर आणि आयुष्यावर काय परिणाम होतात?

२६ जून हा दिवस अंमली पदार्थांचा दुरुपयोग आणि अवैध तस्करी विरोधी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून पाळला जातो. अंमली पदार्थ आणि व्यसनांविरोधातला जागतिक लढा बळकट करण्यासाठी १९८७ मध्ये युनायटेड नेशन्सने हा दिवस पाळायला सुरुवात केली आहे.

मुळात Drugs म्हणजे काय? तर A drug is a substance that has an effect on the body. म्हणजे असे घटक वा पदार्थ ज्यांचा शरीरावर परिणाम होतो.

म्हणजे औषधं – Medicines अशी ड्रग्स आहेत ज्यामुळे आजारी, वेदनांमध्ये असणाऱ्या लोकांना मदत होते.
Recreational Drugs ही लोकांद्वारे घेतली जातात कारण त्यांचं सेवन केल्यानंतर शरीरावर होणारे परिणाम या लोकांना आवडत असतात. यापैकी काही ड्रग्सच्या वापरांसाठी कायदेशीररित्या मान्यता देण्यात आलेली आहे. ती म्हणजे तंबाखू आणि अल्कोहोल. पण ती कोणाला विकत घेता येतील यासाठी नियम आणि कायदे करण्यात आलेले आहेत.

कॉफीमध्ये असणारे कॅफीनही एक प्रकारचे रिक्रिएशनल ड्रग्सच आहे.

पण बहुतेक इतर ड्रग्स बेकायदेशीर आहेत. याशिवाय बाजारात असणाऱ्या काही औषधांचाही गैरवापर करून ती नशेसाठी वापरली जातात.

ड्रग्सचे सेवन केल्याने शरीरावर कोणतं परिणाम होतात?

रिक्रिएशनल ड्रग्स ही डिप्रेसंट (Depressants) किंवा स्टिम्युलंट (Stimulant) प्रकारची असतात.
डिप्रेसंट्स मज्जासंस्थेचं (Nervous System) काम मंदावतात. परिणामी मेंदूकडे आणि मेंदूकडून जाणाऱ्या संदेशांची गती कमी होते.
त्यामुळे त्या व्यक्तीची सतर्कता, एखाद्या गोष्टीला वा कृतीला प्रतिक्रिया देण्याचा वेग मंदवतो

डिप्रेसंटचे एक उदाहरण म्हणजे अल्कोहोल (दारू).

हेरॉईनही डिप्रेसंट आहे, आणि त्याचा वापर आणि विक्री बेकायदेशीर आहे.

या प्रकारच्या ड्रग सेवनाचा परिणाम यकृतावर होतो, मेंदूची हानी होते, मृत्यूही ओढवू शकतो.

तर दुसऱ्या प्रकारचे ड्रग्स असतात स्टिम्युलंट्स – उत्तेजकं.
यामध्ये तुमच्या मज्जासंस्थेमधून जाण्याऱ्या संदेशांचं वहन वेगाने व्हायला लागते.

यामुळे तुम्ही अधिक अलर्ट होता, एखाद्या गोष्टीला प्रतिक्रिया देण्याचा तुमचा वेग वाढतो.

तंबाखूमध्ये असणारे निकोटिन, चहा-कॉफी – एनर्जी ड्रिंक्समध्ये असणारे कॅफीन ही उत्तेजकं आहेत.

कोकेन, एक्सटसी, ॲम्फेटामाईन्स ही बंदी असणारी उत्तेजकं – स्टिम्युलंट ड्रग्स आहेत. यामुळे तुम्हाला उत्साही, आत्मविश्वासपूर्ण वाटत असलं, तरी दुसरीकडे त्याचे यकृत आणि हृदयावर परिणाम होत असतात. स्मरणशक्ती – एकाग्रता कमी होण्यासोबतच मानसिक आरोग्याचे आजारही यामुळे सुरू होऊ शकतात.

ड्रग्सचं व्यसन लागण्याचे कोणतं कारण आहेत?

आपल्या मेंदूमध्ये लाखों नसांचं जाळं असतं. यामधूनच संकेतांचं वहन होत असतं. यातलं एक नेटवर्क असं असतं जे आपल्याला आपण काही कृती केल्यानंतर चांगलं वाटणारी भावना निर्माण करतं. हे नेटवर्क कार्यान्वित होतं तेंव्हा Nerve Cells म्हणजे चेतापेशींमधून डोपामिन स्त्रवतं आणि आपल्यामध्ये ती चांगलं वाटणारी – Feel Good भावना निर्माण होते.

ही चांगलं वाटण्याची भावना जागं करणाऱ्या शरीरातील नेटवर्क्सचा ताबा ड्रग्स घेतात. आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात डोपमिन स्त्रवतं. आणि मेंदूमध्ये ही चांगलं वाटायला लावणारी रसायनं – 'Feel Good Chemicals'साठतात. हेच असतं – High होणं.
हे सगळं पुन्हा अनुभवण्यासाठी पुन्हा पुन्हा या मादक पदार्थांच्या सेवनाची इच्छा निर्माण होते. या सेवनाचे किंवा सेवन केलेलं असतानाच्या काळातल्या कृतींमुळे वाईट परिणाम झाले तरी हे सेवन पुन्हा पुन्हा केलं जातं. यालाच व्यसन – Addiction म्हणतात.

याविषयी एका वृत्तसंस्थेशी बोलतांना मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालक मुक्ता पुणतांबेकर सांगतात, “ड्रग्सविषयी खूप गैरसमज आहेत. एक महत्त्वाचा गैरसमज म्हणजे, त्यांना असं वाटतं की त्याच्यामुळे आनंद मिळतो. खरंतर याच्यामुळे कुठलाच आनंद मिळत नाही. जो काही आनंद मिळत असेल, तो अगदी थोड्यावेळासाठी असतो. आणि त्याच्यासाठी खूप मोठी किंमत द्यावी लागते. आणि एकदा का याची सवय लागली, की नंतर विथड्रॉवल सिम्प्टम्सचा खूप त्रास होतो. त्यामुळे आम्हाला त्यांना हे सांगावं लागतं, की ड्रग्समुळे किंवा कुठल्याही व्यसनामुळे मिळणारा आनंद खूप तात्पुरता असतो आणि त्याच्यासाठी खूप मोठी किंमत द्यावी लागते.

दुसरा एक गैरसमज म्हणजे, ड्रग्सचं सेवन केल्यावर आपलं टेन्शन जातं. टेन्शन तात्पुरतं विसरलं जातं. पण त्याचं जे कारण आहे ते मुळापासून जात नाही. आणि एकंदरीतच त्याच्यामुळे इतक्या समस्या निर्माण होतात, की खरंतर ड्रग्सच्या सेवनामुळे टेन्शन्स खूप वाढत असतात.”

गांजाच्या सेवनाबद्दलच्या गैरसमज बद्दलही मुक्ता पुणतांबेकर सांगतात. त्या म्हणतात, ” गांजाचं सेवन करणाऱ्यांना वाटतं की, गांजा ॲडिक्टिव्ह नाहीये. त्याचं व्यसनात रूपांतर होत नाही कधीकधी पार्टीत घेतला तर चालू शकतं. दुसरं ते सांगतात – गांजात खूप औषधी गुणधर्म आहेत. तर मग तो घेतला तर काय हरकत आहे? अजून एक सांगितलं जातं – अमेरिकेतल्या काही राज्यांमध्ये किंवा युरोपमधल्या काही देशांमध्ये गांजाला कायदेशीर मान्यता आहे. पण याविषयीसुद्धा आम्हाला या सर्वांशी बोलावं लागतं. गांजा खूप ॲडिक्टिव्ह आहे. त्याचं व्यसनामध्ये रूपांतर होतं. त्याचे दुष्परिणाम खूप भयानक असतात.”

सिंथेटिक ओपियॉईड्सची समस्या
ओपियम म्हणजे अफू. त्यापासून तयार होणारा पदार्थ म्हणजे ओपियॉईड्स (Opiods). मॉर्फिन आणि हेरॉईन ही याची उदाहरणं आहेत. तर सिंथेटिक ओपियॉईड्स प्रयोगशाळेत तयार केली जातात. मॉर्फिनच्या तुलनेत सिंथेटिक ओपियॉईड शेकडो पटींनी शक्तीशाली असतात.

सिंथेटिक ड्रग्स किंवा सिंथेटिक ओपियॉइड्स आपल्या मेंदूच्या त्याच भागावर परिणाम करतात ज्या भागावर अफूपासून बनवलेले अंमली पदार्थ परिणाम करतात.

ओपिऑईड्सचा वापर पेन-किलर म्हणजेच वेदनाशामक म्हणून वैद्यकशास्रात केला जातो.
१९५० च्या दशकात औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी ओपयॉइड्सच्या फायदेशीर गुणांची नक्कल करून त्यावर सिंथेटिक ओपियॉइड्स बनवायला सुरुवात केली होती.

अनेक देशांत सिंथेटिक ओपियॉइडचा वापर पेनकिलर किंवा वेदनाशामक औषध म्हणून केला जातो. पण १९९० च्या दशकात याच्या दुरुपयोगाची प्रकरणं समोर येऊ लागली.

ड्रग्स आणि गुन्ह्यांविषयीचा अभ्यास करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या संस्थेच्या रिसर्च विभागाच्या प्रमुख अँजेला मे सांगतात, “जगात ड्रग्स आणि ओपियॉइडच्या गैरवापराविषयी खूपच कमी माहिती आहे. जगभरात अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी ७० टक्के मृत्यू हे ओपियॉइडच्या गैरवापरामुळे होतायत. म्हणजे इतर ड्रग्सपेक्षा ओपियॉइडची समस्या किती भयंकर आहे.”

आता बाजारात शेकडो प्रकारची सिंथेटिक ओपियॉइड्स उपलब्ध आहेत. फेंटानिल त्यापैकीच एक. फेंटानिल हेरॉइनच्या तुलनेत ५० टक्क्यांनी जास्त शक्तिशाली किंवा प्रभावी आहे. इतकं की एखाद्या पार्टीत मोहाला बळी पडून घेतलेली फेंटानिलची एक गोळी जीव घेण्यासाठी पुरेशी ठरू शकते.

ड्रग्सचे शरीरावर परिणाम?

गोळी, इंजेक्शन वा नाकावाटे ओढून घेतलेल्या मादक पदार्थांमुळे प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर वेगवेगळे परिणाम होऊ शकतात.

म्हणजे या ड्रग्सचा अंमल असताना योग्य-अयोग्याचं भान राहत नाही, नीट – सुसंगत विचार करता येत नाही, आपल्या क्रिया मंदावतात, धूसर दिसतं, Hallucinations म्हणजे प्रत्यक्षात नसणाऱ्या गोष्टींचे आभास होतात, आवाज येतात.
पण या अंमली पदार्थांच्या सेवनाचे शरीरावर दीर्घकालीन परिणामही होतात.

यकृतावर परिणाम होतो. फॅटी लिव्हर, अल्कोहोलिक हेपेटायटिस, लिव्हर सिऱ्होसिस चा धोका निर्माण होतो. याशिवाय अल्सर, हृदयविकार, कर्करोग, उच्च रक्तदाब यांचाही धोका उद्भवतो.

शरीराला अंमलाखाली राहण्याची सवय झाल्यास त्याचा परिणाम इतर वेळीही दिसून येतो. अशा व्यक्तींना एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायला कठीण जातं, एकाग्रता राहत नाही. नैराश्य येऊन मानसिक आरोग्याच्या समस्याही यातून निर्माण होतात.

एखादी व्यक्ती अंमलाखाली असताना तिचा स्वतःच्या विचारांवर, कृतींवर ताबा नसतो. ही व्यक्ती हिंसक होण्याची शक्यता असते. यातूनच त्यांच्या आणि त्यांच्याभोवती असणाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

मुक्ता पुणतांबेकर सांगतात, “एकदा का व्यसन लागलं, ही वेगवेगळ्या प्रकारचे दुष्परिणाम जाणवायला लागतात. एकतर प्रचंड आर्थिक नुकसान. कारण पैसे खूप खर्च होत असतात. हे सगळं जे चाललेलं असतं ते बेकायदेशीर आहे. त्यामुळे हे लक्षात घ्यायला हवं की आपल्यावर या गोष्टीमुळे कायदेशीर कारवाई होऊ शकते. करियर जाऊ शकतं. कारण जेंव्हा ते व्यसनाच्या आहारी जातात. तेंव्हा शाळा-कॉलेजात जाणं बंद होतं. गेले तरी अभ्यासात लक्ष लागत नाही. त्यामुळे पुढच्या सगळ्याच समस्या निर्माण होऊ शकतात. असं दिसून येतं की कुठल्याही प्रकारचं व्यसन केलं, तर शारीरिक, मानसिक, आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक अशा खूप वेगवेगळ्या समस्या निर्माण होत असतात.”

व्यसनं आणि व्यसनाधीनता याचे परिणाम फक्त त्या व्यक्तीवरच नाही तर तिच्या संपूर्ण कुटुंबावरही होत असतात. व्यसनामधून बाहेर पडणं शक्य आहे. आणि त्यासाठी तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्यांना मदत हवी असेल तर या हेल्पलाईनवर संपर्कसाधून मदत घेता येईल .

राष्ट्रीय नशामुक्ती अभियान हेल्पलाईन :१४४४६

National Toll Free Drug De-addiction Helpline Number 18-00-11-00-31