बीड जिल्ह्यात काॅपी पुरवठा करणाऱ्या टोळ्या सक्रिय
1 min readमुंबई: (वृत्तसंस्था) महाराष्ट्रात सध्या चालू असलेल्या पोलिस भरतीत मोठ्या प्रमाणात काॅपी झाल्याचे उघडकीस आले आहे. यात मुंबई पोलिसांच्या नुकत्याच पार पडलेल्या भरतीत लेखी परीक्षेत कॉपीसाठी वापरण्यात आलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान पाहून पोलिस ही चक्रावले आहेत. मुंबईत परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्याला शेकडो किमी दूरवरून कुणीतरी उत्तरे सांगत होता. अशा कॉपीसाठी चिनी तंत्रज्ञानाचा वापर केल्याचे पोलिस तपासात उघड झाले असून पोलिसांच्या तीन पथकांनी मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून २५हून अधिक काॅपी हवलदारांना अटक केली आहे, यामध्ये काही उमेदवार आहेत.
मुंबई पोलिस दलातील कॉन्स्टेबलच्या ७०७६ पदांसाठी सुमारे ५ लाख ८१ उमेदवार मैदानात उतरले होते. ३१ जानेवारीपासून या पदांसाठी मैदानी चाचणी सुरू झाली. दोन लाखांपेक्षा अधिक उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले. मात्र उपल्ब्ध पदे आणि एकूण उमेदवार यांच्यातील संख्येनुसार प्रमाण ठरविण्यात आले. त्यानुसार ८३ हजार ७४३ उमेदवार पात्र ठरले. या सर्व उमेदवारांची लेखी परीक्षा ७ मे रोजी मुंबईतील विविध कॉलेजमध्ये आणि शाळांतील २१५ केंद्रांवर घेण्यात आल्या. राज्यभरातून ७८ हजार ५२२ उमेदवार रविवारी लेखी परीक्षेला बसले होते. २१५ परीक्षा केंद्रांवर १२४६ अधिकारी आणि ५९७५ कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. यावेळी एक उमेदवार प्रश्नपत्रिकेकडे न पाहता केवळ उत्तरे लिहित असल्याचे पर्यवेक्षकांच्या लक्षात आले. त्याची झडती घेतली असता डेबिट कार्डाच्या आकाराचे एक कार्ड आढळले. शर्टावर बटण कॅमेरा आणि कानात खोलवर ‘इलेक्ट्रिक इअरबर्ड’ आढळले. पहिल्याच दिवशी भांडुप, गोरेगाव, मेघवाडी, कस्तुरबा मार्ग आणि दहिसर येथे पाच गुन्हे दाखल करण्यात आले. यात हायटेक तंत्रज्ञान चा वापर करून कॉपी केल्याचा प्रकार प्रथमच उजेडात आल्याने मुंबई पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली. तीन पोलिस उपायुक्तांच्या देखरेखीखाली तीन पथके तयार करण्यात आली. तांत्रिक विश्लेषण, तपास कौशल्य आणि खबऱ्यांचे जाळे विणून पोलिसांच्या पथकांनी वेगवेगळ्या भागांतून आत्तापर्यंत सुमारे २५हून अधिक आरोपींना अटक केली आहे. गुरुवारी भांडुप पोलिसांनी याप्रकरणात दोन उमेदवारांनाही अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना १९ जूनपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे. सदरील भरतीत
शैक्षणिक पात्रता नसलेला एकही उमेदवार पोलिस दलात नियुक्त होऊ नये याची खबरदारी मुंबई पोलिसांनी घेतली. कॉपीची पाळेमुळे छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांत काॅपी पुरवठा करणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याची बाब आत्तापर्यंतच्या तपासातून समोर आली आहे.
लेखी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांकडून प्रत्येकी आठ लाखांपासून सुमारे पंधरा लाख रुपयांपर्यंत पैसे घेण्यात आल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे.
या बाबतीत अटक करण्यात आलेल्या आरोपींनी सरकारी खात्यांमधील विविध पदांच्या इतरही परीक्षांमध्ये अशाच प्रकारे कॉपी केल्याचे त्यांच्या चौकशीतून समोर आले आहे. मुंबईमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या लिपिक पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. दरम्यान महाराष्ट्रात घेण्यात आलेल्या विविध सरकारी भरतीत देखील काॅपी झाल्या असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहेत.