चक्क अतिसुरक्षित मंत्रालयातून शासकीय दस्ताऐवज गायब
1 min readमुंबई: (प्रतिनिधी)- शासकीय कार्यालयांमधून कागदपत्रे गहाळ होण्याचे प्रकार काय नवीन नाही. शासकीय कार्यालयांमध्ये असे प्रकार अधूनमधून घडत असतात. मात्र, आता सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मंत्रालयातूनच फाइल चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. मंत्रालयात असलेल्या चित्रीकरण स्टुडिओच्या उभारणीसंदर्भातील ही फाइल असून सरकारी अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून या प्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाने घेतलेले निर्णय, वेगवेगळ्या योजना, खरेदी-विक्री, निविदाप्रक्रिया या सर्वांचे दस्तऐवज मंत्रालयात जतन करून ठेवले जातात. त्या त्या विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर हे दस्ताऐवज सांभाळण्याची जबाबदारी असते. शासनाच्या विविध योजनांची प्रसिद्ध देण्यासाठी चित्रफिती तयार करणे आणि मंत्री, सनदी अधिकाऱ्यांच्या मुलाखती चित्रित करण्यासाठी मंत्रालयाच्या तळमजल्यावर चित्रीकरण स्टुडिओ तयार करण्यात आला आहे. या स्टुडिओच्या उभारण्यासाठी शासनाची मान्यता मिळविण्यात आली. स्टुडिओ अद्ययावत करण्यासाठी निविदाप्रक्रिया काढण्यात आली. स्टुडिओला मंजुरी मिळण्यापासून ते उभारणीपर्यंत सर्व इत्थ्यंभूत माहिती मंत्रालयातील माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय कार्यालयात ठेवण्यात आली होती. मंत्रालयातील विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी फायलींचे वर्गीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यावेळी स्टुडिओच्या उभारणीसंदर्भातील दस्ताऐवज गायब झाल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी या फाइलबाबत अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली. मात्र कुणाकडेच माहिती उपलब्ध नव्हती. मंत्रालयात ठिकठिकाणी शोधूनही फाइल सापडत नसल्याने मंत्रालयीन कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यांच्या तक्रारीवरून मरीन ड्राईव्ह पोलिसांनी महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या बाबतीत मरीन ड्राईव्ह पोलिस अधिक तपास करीत आहेत.