जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

दुचाकी अपघातात गेल्या पाच वर्षांत २८ हजार ७२ दुचाकीस्वारांचा मृत्यू

1 min read

मुंबई: (वृत्तसंस्था)बेशिस्त दुचाकी वाहतूकीवर लगाम लावणे गरजेचे असून या बेशिस्तीमुळे राज्यात गतवर्षी पाच हजार २७९ दुचाकीस्वारांनी हेल्मेटअभावी प्राण गमावले आहे. मुंबईसह राज्यात दुचाकी-चारचाकींची संख्या वाढत असली तरी त्या तुलनेत सुरक्षिततेबाबत वाहनचालकांची मानसिकता तयार झालेली दिसत नाही. हे अपघाताच्या आकड्यांवरून स्पष्ट होत आहे. यामुळे दुचाकीस्वारांमध्ये हेल्मेट वापराबाबत व्यापक जनजागृती करणे आवश्यक आहे. प्रत्येक शहरात द्रुतगती आणि राष्ट्रीय महामार्गासह राज्यातील महामार्गांवर दुचाकीस्वारांचा मुक्त वावर कायम आहे. द्रुतगती महामार्गावर दुचाकीला बंदी असली तरी काही पट्ट्यात राष्ट्रीय महामार्गावरून द्रुतगती महामार्गावर दुचाकीस्वार प्रवेश करतात. शहरासह महामार्गांवर धावणाऱ्या अनेक दुचाकीस्वारांकडे हेल्मेटही नसते यामुळे अपघातात त्यांचा मृत्यू होतो. केवळ हेल्मेट नसल्याने २०१७ ते २०२२ या पांच वर्षाच्या कालावधीत २८ हजार ७२ दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. तसेच ४३ हजारांहून अधिक प्रवासी अपघातात जखमी झाले आहेत. एकूण रस्ते अपघातातील मृत्यूंपैकी हेल्मेटचा वापर न केल्यामुळे ३० टक्क्यांपेक्षा अधिक दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. सीटबेल्ट न लावल्याने होणाऱ्या मृत्यूंची संख्या दहा टक्क्यांहून अधिक आहे. सीटबेल्ट आणि हेल्मेट अतिशय लहान तरीही अपघातात कमी दुखापत होण्यासाठी शक्तिशाली उपकरणे आहेत, अशी प्रतिक्रिया रस्ते सुरक्षा क्षेत्रातील सेव्हलाइफ फाऊंडेशनचे संस्थापक आणि कार्यकारी अधिकारी पीयूष तिवारी यांनी दिली.चांगल्या दर्जाच्या हेल्मेटच्या किंमती अधिक असल्याने वाहनचालकांकडून रस्त्यालगत विकल्या जाणाऱ्या साध्या हेल्मेटचा वापर केला जातो. अपघातसमयी असे हेल्मेट जीवरक्षकाचे काम करत नाहीत. हेल्मेट वापराच्या प्रसारासाठी विविध जनजागृती उपक्रम परिवहन विभागाकडून आयोजित करण्यात येतात, असे परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले असले तरी लोकांमध्ये हेल्मेट वापरा विषयी अधिक जनजागृती करणे आवश्यक आहे. या बेशिस्तीमुळे दर वर्षी किती लोक मृत्युमुखी पडले आहे ते खालील प्रमाणे.२०२२ /५,२७९ २०२१ /४,९६६ २०२० /४,८७८ २०१९ /४,३२८ २०१८/ ४,२५२ २०१७ /४,३६९ वरील आकडे हे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अहवालात नमूद आहेत.