जातीवादामुळे त्रस्त तब्बल दिडशे दलित घरे गाव सोडून जाणार
1 min read
🟥कामगार मंत्री खाडे यांच्या मतदारसंघातील धक्कादायक प्रकार🟥
सांगली: (प्रतिनिधी)- आज मंगळवारी मिरज तालुक्यातील बेडग येथील दलित समाजाने गाव सोडून जाण्याचा निर्धार केला असून गावातून सर्व संसार घेऊन दलित समाज पायी मंत्रालयाकडे रवाना होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची कमान पडल्यानंतर गावात जातीयवाद होत असल्याचा आरोप करत अन्य गावात पुनर्वसन करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे बेडग हे कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या मतदारसंघातले गाव आहे.
सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात बेडग येथे दलित समाजाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची स्वागत कमान उभारण्यात येत होती. बेडग ग्रामपंचायतीने कमान बांधण्यासाठी परवानगी देखील दिली होती. मात्र १६ जून रोजी कामन बेकादेशीर असल्याचे ठरवत, ग्रामपंचायतानी बांधकाम सुरू असलेली कमान पाडून टाकली. यानंतर जिल्ह्यातील आंबेडकर प्रेमींनी याला विरोध केला होता. बांधकाम पाडल्यानंतर गावात तणावाचे वातावरण देखील निर्माण झाले होते. त्यानंतर कमान पाडणाऱ्या सरपंचासह संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करत जिल्ह्यातल्या समस्त आंबेडकर प्रेमीकडून आंदोलन करण्यात आले होते . यानंतर बेडग गावातल्या दलित समाजासोबत जातीयवादी सुरू असल्याचा आरोप करण्यात आला होता. गावात होणाऱ्या त्रासामुळे दलित समाजाकडून थेट गाव सोडण्याचा निर्धार करण्यात आला आहे. ज्या गावात डॉक्टर आंबेडकरांच्या नावाला विरोध होतोय त्या गावातून बाहेर पडायचा निर्धार समस्त दलित समाजाकडून घेण्यात आला आहे. बेडग गावामध्ये सुमारे १५० हून अधिक दलित समाजाचे घरे आहेत. सर्वांनी गाव सोडून जाण्याची भूमिका घेतली आहे. मंगळवारी गावातील दलित समाज गाव सोडून थेट मंत्रालयाकडे आपला संसार साहित्य, गुरढोरं आणि मुलाबाळांसह रवाना होणार आहेत.आणि मंत्रालयाकडे पायी जाऊन आंदोलन करत जातीवाद नसणाऱ्या गावात पुनर्वसन करण्याची मागणी करणार आहेत. तर गाव सोडत असल्याबाबतचं पत्र देखील बेडग ग्रामस्थांच्यावतीने सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. बेडग गाव हे राज्याचे कामगार मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या मतदारसंघातला गाव आहे. पुरोगामी टेंभा मिरवणाऱ्या आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या बाता मारणाऱ्या महाराष्ट्रात दलित समाजावर गाव सोडण्याच्या आलेल्या धक्कादायक प्रकाराबाबत राज्यसरकार काय भूमिका घेणार ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मात्र समाजांतील जातीवादी प्रवृत्ती नष्ट करण्याची जबाबदारी हे समाजाचीही आहे.