जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

7 December 2024

मैं ‘ ताली ‘ बजाऊंगी नहीं ; बजवाऊंगी ! – सुष्मिता सेन

1 min read

प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन सध्या 'ताली' या वेब सिरीजमुळे खूप चर्चेत आहे.' ताली' हे वेब सिरीज तृतीयपंथीयांच्या सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित असून लवकरच प्रदर्शित होणार आहे.

मुंबई: (वृत्तसंस्था)- “विश्वसुंदरी” हिन्दी चित्रपट विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन सध्या खूप चर्चेत आहे. सुष्मिता लवकरच ‘ताली’ या वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. तृतीयपंथीय आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्या आयुष्यावर आधारित ‘ताली’ ही वेब सीरिज असणार आहे. त्यामुळे घोषणा झाल्यापासूनच ही वेब सीरिज चर्चेत आहे. आता सुष्मिताने या भूमिकेसाठी केलेल्या तयारीवर भाष्य केले आहे. सुष्मिता स्वत: अनेक जणांसाठी प्रेरणादायी आहे. १९९६ साली रुपेरी पडद्यावर झळकलेल्या ‘दस्तक’ या हिंदी चित्रपटापासून सुष्मिता हिचं अभिनय क्षेत्रात पदार्पण झाले. सुष्मिताने हिन्दीतील अनेक सुपरहिट चित्रपटात तसेच काही तमिळ आणि इंग्रजी चित्रपटात सुध्दा काम केले आहे.

सुष्मिता नेहमी तिचं फिल्मी करिअर असो किंवा खासगी आयुष्य, सुष्मिताने असे काही निर्णय घेतले की, त्याची चर्चा झाली. आता पुन्हा एकदा सुष्मिता तिच्या या हटके भूमिकेमुळे चर्चेत आली आहे. तृतीयपंथीय व्यक्तीची भूमिका साकरणे, सुष्मितासाठी सोपे नव्हते. सुष्मिताने एका मुलाखतीत या भूमिकेबद्दल सांगितले आहे. फक्त तृतीयपंथीय म्हणून नाही तर, सुरुवातीला एक पुरुषाचीही भूमिकाही होती. सुरुवातीला गणेश आणि नंतर गौरी असा हा प्रवास साकरण्यासाठी सुष्मिताने प्रचंड मेहनत घेतली आहे.

गणेशचे आयुष्य दाखवण्यासाठी शूटिंगदरम्यान, मी छातीवर पट्ट्या लावल्या होत्या, असे सुष्मिताने सांगितले. तसेच चालण्यात, बोलण्यातही बराच बदल केला होता. तर या भूमिकेसाठी वजनही वाढवले होते, असंही सुष्मिता सांगते. दरम्यान, रवी जाधव दिग्दर्शित आणि क्षितिज पटवर्धन लिखित या बायोपिकमध्ये सुष्मिता सेनचा फर्स्ट लूकपाहून चाहत्यांना आश्चर्य वाटले होते. कारण सुष्मितासाठी ही भूमिका आव्हानात्मक असणार आहे.

याआधी ‘आर्या’ या सीरिजमधून तिने ओटीटीवर प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता ‘ताली’ देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. त्यामुळे चाहते उत्सुक आहेत. सुष्मिताचे सर्वच स्तरातून कौतुक होत असताना गौरी यांनीही अनेकदा सुष्मिताचे कौतुक केले आहे.

गौरी यांनी सुष्मितासोबत एक फोटो शेअर करत म्हटले आहे की, ‘आम्ही मूळ बायकाच. त्यात माझा रोल तू करणार म्हणजे दुग्धशर्करा योग. हा माझ्या समाजाचा खूप मोठा सन्मान, तुझ्या धाडसाला त्रिवार सलाम.’

दरम्यान प्रेक्षकांत आणि सुष्मिता हिच्या चाहत्यांमध्ये गौरी सावंत बद्दल माहिती घेण्यासाठी उत्सुकता वाढली आहे.

‘ताली’ ही सीरिज ज्यांच्या आयुष्यावर आधारीत आहे त्या गौरी सावंत या एक सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्या तृतीयपंथी असून २०१० मध्ये त्यांनी तृतीयपंथीयांच्या हक्कांसाठी सखी चारचौघी ही संस्था स्थापन केली. ट्रान्सजेंडर आई म्हणून त्यांनी जगात आपली ओळख निर्माण केली. तृतीयपंथी असल्याचे जाणवल्यानंतर ज्यांना त्यांच्या कुटुंबीयांनी नाकारले आणि त्यामुळे घर सोडलेल्या तृतीयपंथीयांना आधार देण्यासाठी गौरी सावंत यांचे कार्य मोठे असून ‘ताली’ हे बेव सीरिज सावंत यांच्या आयुष्यावर आधारित आहेत.