डब्ल्यूडब्ल्यूई च्या रेसलरने घेतला अवघ्या ३६ व्या वर्षी जगाचा निरोप
1 min read
मुंबई: (वृत्तसंस्था)- डब्ल्यूडब्ल्यूई रिंगमध्ये द फिन्ड आणि ब्रे वायट या नावाने प्रचंड प्रसिद्ध असलेला विंडहैम रोटुंडा रेसलर याने जगाचा निरोप घेतला आहे. जबरदस्त शरीरयष्टी असलेल्या रोटुंडाचे वयाच्या अवघ्या ३६ व्या वर्षी निधन झाल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे.
भल्याभल्यांना रिंगमध्ये पाणी पाजणाऱ्या रोटुंडाची मृत्यूशी झुंज मात्र अपयशी ठरली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ब्रे वायट गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजाराने त्रस्त होता. पण नेमकं काय झाले होते याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. आजार बळावल्याने गेल्या काही महिन्यांपासून रिंगपासून दूर गेला होता. मात्र हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधनाची बातमी समोर आल्याने त्याच्या चाहत्यांना विश्वास बसणं कठीण झाले आहे.
घरच्यांनी ब्रे वायट याचे निधन झाल्याच्या बातमीला दुजोरा दिल्यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे. विंडहैम रोटुंडा आणि डब्ल्यूडब्ल्यूईचं नातं
विंडहैम रोटुंडा याच्या तीन पिढ्यांनी डब्ल्यूडब्ल्यूई रिंग गाजवली आहे. विंडहेमचे आजोबा ब्लॅकजॅक आणि वडील माइक रोटुंडा यांनी डब्ल्यूडब्ल्यूई रिंगमध्ये आपली ताकद दाखवली आहे.त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत विंडहैमने याच क्षेत्रात आपले करिअर करण्याचं ठरवले. ब्रे वायटने दोन वेळा डब्ल्यूडब्ल्यू युनिव्हर्सल चॅम्पियनशिप, तर एकदा डब्ल्यूडब्ल्यूई चॅम्पियनशिपवर नाव कोरले आहे. २०१९ मध्ये ब्रे वायटला डब्ल्यूडब्ल्यूई मेल रेसलर ऑफ द ईअर या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
दरम्यान डब्ल्यूडब्ल्यूई कंपनीचे सीईओ ट्रिपल एच यांनी सोशल मीडियावर ब्रे वायट याच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर ट्वीट करत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ट्रिपल एचने ट्वीट करत लिहिलं आहे की, “डब्ल्यूडब्ल्यूई हॉल ऑफ फेम आणि विंडहैमचे वडील. माईक रोटुंडा यांनी फोन करून निधनाची बातमी दिली आहे. आमच्या डब्ल्यूडब्ल्यूई कुटुंबातील एक सदस्य आम्ही गमावला आहे. आम्ही त्या कुटुंबाच्या दु:खात सहभागी आहोत. ईश्वर त्याच्या आत्म्याला शांती देवो. ”
वायट रेसलमेनिया ३९ मध्ये पुन्हा एकदा रिंगमध्ये उतरेल अशी अपेक्षा होती. ऑगस्टच्या सुरुवातीला त्याच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत होती. पण अचानक त्याच्या निधनाची बातमी समोर आली आहे.