जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

21 October 2025

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे गरजवंत रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन

1 min read

मुंबई: (वृत्तसंस्था)- महाराष्ट्र राज्यात सुरु असलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत अवघ्या १४ महिन्यात १३ हजाराहून अधिक गोरगरीब – गरजवंत रुग्णांना एकूण ११२ कोटी १२ लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित केली आहे. त्यातच आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळविणे आणखी सोपे झाले असून यासाठी मंत्रालयात जाण्याची आवश्यकता भासणार नाही. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे सीएमएमआरएफ या अँप्लिकेशनवर अर्ज भरुन मदत मिळविता येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने मागील वर्षी पहिल्याच जुलै महिन्यात १७८ रुग्णांना ७६ लाखांची मदत देण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशीलतेमुळे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये अनेक-विविध आजारांचा समावेश देखील करण्यात आला आहे. यामध्ये अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, कर्करोगावरील शस्त्रक्रिया, केमोथेरपी, डायलिसिस, जन्मतः मूकबधिर लहान मुलांच्यासाठी अत्यावश्यक असणारी कॉकलीयर इनप्लांट शस्त्रक्रिया, सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, विद्युत अपघात, भाजलेले रुग्ण, जन्मतः लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया आदींचा समावेश आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांचे प्राण वाचविण्यात यश मिळविले आहे. यामुळे अनेक रुग्णांना अक्षरशः जीवनदान मिळाले आहे. गोरगरीब गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून अर्थसहाय्य केले जाते. या निधीचा जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी केले आहे.