मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात भाजपचे शक्ती प्रदर्शन.
1 min read
ठाणे: (प्रतिनिधी)आज मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात अर्थात ठाण्यात भाजपचा पदाधिकारी-कार्यकर्ता मेळावा होत आहे. मोदी सरकारने नऊ वर्षांत राबविलेल्या विविध योजनांचा प्रचार करणेकामी आज रविवार, ११ जूनला भाजपचा हा मेळावा ठाण्याच्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात होत आहे. या मेळाव्याला तीन कॅबिनेट मंत्र्यांसह या भागातील स्थानिक आमदार व माजी खासदार हे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कानमंत्र देणार आहेत. सध्या युतीमध्ये चालू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे वरिष्ठ नेते या मेळाव्यात पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच भाजपच्या या शक्तिप्रदर्शनाचे येथील स्थानिक राजकारणावर काय पडसाद उमटतात, यावरून शिवसेना-भाजप युतीचे आगामी काळातील भवितव्य ठरणार आहे. डोंबिवलीतील भाजपचे पदाधिकारी नंदू जोशी यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी बंडाचे ध्वज फडकावले होते. त्यामुळे शिंदे गट व भाजपमधील अंतर्गत वाद उफाळून आला होता. त्यावरून जोशी यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदविणारे मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांचे निलंबन होईपर्यंत शिवसेनेच्या शिंदे गटाला सहकार्य करणार नसल्याचे आणि त्यांच्या सर्व कार्यक्रमांवर बहिष्कार टाकायचा, असा ठरावही या भाजप पदाधिकाऱ्यांच्या मंथन बैठकीत करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आता काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात भाजपच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा मेळावा होत आहे. ठाणे लोकसभा मतदार संघाच्या या मेळाव्याला भाजप नेते व राज्याचे मंत्री गिरीश महाजन, ना. मंगल प्रभात लोढा, ना. रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याला आ. संजय केळकर, आ. गणेश नाईक, भाजपा प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, माजी खासदार विनय सहस्रबुद्धे मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसात शिंदे गट आणि भाजपच्या ताणलेल्या संबंधांना या मेळाव्यातून धक्का बसतो की दोन्हीकडील पदाधिकाऱ्यांचे सूर जुळून येतात, हे पाहावे लागणार आहे.