शेतकरी आणि ऊसतोड कामगारांच्या जीवनात माजी मंत्री अशोकराव पाटलांनी नंदनवन फुलवले – नवनाथराव थोटे
1 min readबीड: (प्रतिनिधी)- बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ गांधी घराण्याचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री अशोकरावजी पाटील यांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्येओसाड माळरानावर नंदनवन फुलवून शेतकरी शेतमजूर आणि ऊसतोड कामगारांच्या जीवनामध्ये समृद्धी आणण्याचे काम केले. माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला कारखान्याचे चेअरमन केले तसेच सर्व संचालक मंडळाची बिनविरोध निवड करून राज्यातील सहकार क्षेत्रात एक आदर्श निर्माण केला. ही बाब बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राला कौतुकास्पद आणि भूषणीय आहे अशा अद्वितीय व अलौकिक व्यक्तिमत्व असणाऱ्या अशोकराव पाटील यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे त्यांचे मार्गदर्शन आणि सल्ला आम्हाला काम करण्यासाठी सातत्याने प्रेरणा आणि बळ देतो या शब्दात डॉ. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याचे चेअरमन नवनाथराव थोटे यांनी डॉ पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या पहिल्या सभेच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना माजी मंत्री अशोकराव पाटील यांचे आभार मानत ऋण व्यक्त केले. यावेळी कारखान्याचे व्हॉइस चेअरमन बाबाराजे देशमुख, युवराज जाधव, सुभाष कुलकर्णी, श्रीमती उर्मिला आंधळे, श्रीमती वैशाली मेटे, दत्तात्रय चाळक, पुरुषोत्तम इथापे, प्रकाश शेठ भन्साळी, दत्तात्रय मुळे, राम विखे, कारखान्याचे एमडी दत्तात्रय नन्नावरे आदी उपस्थित होते.
पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची चेअरमन नवनाथराव थोटे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीच्या सुरुवातीला
माजी मंत्री अशोकराव पाटील यांच्या सत्काराचा ठराव व्हॉइस चेअरमन श्री बाबाराजे देशमुख यांनी मांडला. सदरील ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. त्यानंतर माजी मंत्री अशोकराव पाटील यांचा संचालक मंडळाच्या वतीने चेअरमन नवनाथराव थोटे यांनी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करत सर्व संचालक मंडळाची बिनविरोध निवड केल्याबद्दल आभार मानले.
यावेळी काही निवडक संचालकांनी माजी मंत्री अशोकराव पाटील यांच्या कार्याबद्दल विचार मांडले.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना
चेअरमन नवनाथराव थोटे म्हणाले की, माजी मंत्री अशोकराव पाटील यांनी आपल्या कार्यकाळात
बीड जिल्ह्यात आपल्या मंत्रिपदाचे वजन वापरून विविध योजना कार्यान्वित केल्या. गेली कित्येक वर्षापासून बीड जिल्हा ऊसतोड कामगार आणि मजुरांचा जिल्हा म्हणून ओळखला जात होता. ही ओळख पुसण्यासाठी अशोकरावजी पाटील यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. त्यांचा कार्यकाळ म्हणजे बीड जिल्ह्याचा सुवर्णकाळ होता. त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा ठसा बीड जिल्ह्याच्या विकासकामांसाठी उमठवला. बीड जिल्ह्यातील अनेक गावांमधील शेतात साधी कुसळं ही उगवत नव्हते. तशा हजारों एकर ओसाड जमिनी माळरान होती. ती शेतजमीन पश्चिम महाराष्ट्रा सारखी ओलिताखाली आणण्यासाठी अशोकराव पाटील यांनी बीड जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आपल्या मंत्रिपदाचा पुरेपूर वापर केला. अशोकराव पाटील यांच्या दूरदृष्टीतून बीड जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी त्यांनी प्रामुख्याने गावंदरा धरण, मनकर्निका धरण, अप्पर मांजरा, पौंडुळ धरणांना मंजुरी आणून त्या धरणांचे काम जलदगतीने पुर्ण केले. त्यामुळे आज बीड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये हजारों एकर जमीन ओलिताखाली आली आहे. त्या शेतामध्ये आज नगदी पीक म्हणून ऊसाची लागवड केली जात आहे. ज्या ओसाड आणि माळरान म्हणून शेतीकडे पाहिले जात होते. त्या शेतीचे मालक शेतकरी ऊस बागायतदार झाले आहेत. आज त्यांच्या घरात आर्थिक सुबत्ता आली आहे. या सर्व बाबींचे श्रेय फक्त माजी मंत्री अशोकराव पाटील आणि खा.सौ. रजनीताई यांनाच जाते. थोडक्यात जो शेतकरी ऊस तोडणीसाठी पश्चिम महाराष्ट्रात जात होता. तो शेतकरी आज माजी मंत्री अशोकराव पाटील यांच्यामुळे बागायतदार झाला आहे. एकंदरीत शेतकऱ्यांच्या शेत मजुरांच्या जीवनात ख-या नंदनवन फुलवण्याचे काम माजी मंत्री अशोकराव पाटील यांनी केले. बीड जिल्ह्यातील दळणवळण यंत्रणा अत्याधुनिक व्हावी या उद्देशाने अशोकराव पाटील यांनी बीड जिल्ह्यातील हजारों गावे एकमेकांना जोडण्यासाठी रस्ते जोडण्याचे काम हाती घेऊन ते तातडीने पूर्ण केले. जिल्ह्यातील पाली गावात युवा शांतीवनाची निर्मिती केली. लिंबागणेश आणि नाळवंडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची मंजुरी आणून कै. शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करून या वास्तू लवकरात लवकर लोकसेवेत अर्पण केल्या. तसेच चिंचवण येथील 33 के.व्ही.चे उद्घाटन केले . ही सर्व कामे स्वतः अशोकराव पाटील यांनी जातीने लक्ष घालून पूर्ण केली. अशोकराव पाटील यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण केले. त्यामुळे त्यांचा राजकारणापेक्षा समाजकार्याकडे मोठा कल होता. सामाजिक, राजकीय, आर्थिक क्षेत्राबरोबरच सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रातही अशोकराव पाटील यांनी भरीव कामगिरी केली आहे. शिक्षण क्षेत्रात माऊली विद्यापीठाच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात शिक्षण संस्थेचे जाळे निर्माण केले. या माऊली विद्यापीठाच्या माध्यमातून जिल्ह्यातील लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणाची मोठी संधी निर्माण करून दिली. जिल्ह्यातील अनेक गावांत वाडी, वस्ती तांड्यावरील बहुजन, गोर गरीब, दीन दलितांच्या मुलांना शिक्षणाची सोय उपलब्ध झाल्यामुळे आज लाखो विद्यार्थी शिक्षक प्राध्यापक, पोलीस, डॉक्टर, इंजिनियर, वकील झाले आहेत. त्याच बरोबर शेकडो विद्यार्थी प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी म्हणून कार्यरत होऊन समाजसेवा आणि देशाचीसेवा करत आहेत. भविष्यात देखील पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना शेतकरी शेतमजूर आणि ऊसतोड कामगारांसाठी एक वरदान ठरणार आहे अशा या मोठ्या संस्थेची जिम्मेदारी आमच्यावर सोपवून आम्हाला कार्य करण्याची संधी दिली. त्याबद्दल माजी मंत्री अशोकराव पाटील यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. आम्ही सर्व संचालक मंडळाच्या वतीने कायम आपल्या ऋणात राहू असे सांगत चेअरमन नवनाथराव बापू थोटे यांनी माजी मंत्रीअशोकराव पाटील यांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कारखान्याचे एमडी नन्नावरे यांनी तर आभार संचालक रवींद्र सोनवणे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.