जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

जम्मू- काश्मीर आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या तारखा जहीर ; महाराष्ट्रातील निवडणूक अनिश्चित

1 min read

नवी दिल्ली: (वृत्तसंस्था)काही दिवसांतच देशातील विविध राज्यांतील विधानसभा निवडणुक होणार आहे. दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाने काल (१६ ऑगस्ट) रोजी जम्मू-काश्मीर आणि हरियाणा या दोन्ही राज्यांसाठी निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी जम्मू-काश्मीर आणि हरियाणासाठी निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केले आहे.

त्यांच्यासोबत निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू हेही उपस्थित होते.

२०१९ मध्ये हरियाणा, झारखंडसोबतच महाराष्ट्राच्याही निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखाही जाहीर होणार का, अशी उत्सुकता सर्वांना होती.

मात्र निवडणूक आयोगाने दोनच राज्यांच्या निवडणुका जाहीर केल्या.

महाराष्ट्राच्या विधानसभेच्या कार्यकाळाचा विचार करता नोव्हेंबरपर्यंत सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ आहे. त्यापूर्वी नवं सरकार स्थापन होणे अपेक्षित आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या निवडणुका कधी जाहीर होणार हा प्रश्न आहे.

सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर २०२४ पर्यंत जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका घेण्यासाठी सरकारने पावले उचलायला हवी असे निर्देश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर जम्मू आणि काश्मीरमध्ये निवडणुका जाहीर करण्यात आल्या असून जम्मू काश्मीरमध्ये कधी होणार निवडणूक?

जम्मू काश्मीरमध्ये तीन टप्प्यात विधानसभा निवडणुका घेण्यात येणार आहेत.

१८ सप्टेंबर, २५ सप्टेंबर आणि ०१ ऑक्टोबरला जम्मू-काश्मिरमध्ये मतदान होणार आहे. तसेच ०४ ऑक्टोबरला निकाल जाहीर होतील.

जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या ९० जागा आहेत. त्यांपैकी ७४ सर्वसाधारण प्रवर्गातील आहेत, ९ एसटी आणि ७ एससी प्रवर्गाच्या जागा आहे.

सुप्रीम कोर्टाने गेल्या वर्षी दिलेल्या एका निर्णयामध्ये निवडणूक आयोगाला जम्मू काश्मीरमध्ये ३० सप्टेंबरपूर्वी निवडणुका घेण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश दिले होते.

जम्मू काश्मीरमधून ३७० कलम हटवण्याच्या विरोधातील याचिकेवरील सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने हा आदेश दिला होता.

लडाखचा केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा सु्प्रीम कोर्टाने कायम ठेवला होता. त्याचवेळी जम्मू-काश्मीरला वेगळ्या राज्याचा दर्जा बहाल करून त्याठिकाणी निवडणुका घ्याव्यात असंही सुप्रीम कोर्टाने म्हटलं होते.

भारतीय निवडणूक आयोगाने ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत जम्मू आणि काश्मीरमध्ये निवडणुका घ्याव्यात असे निर्देश सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने दिले होते.

हरियाणात राज्यात कधी होणार निवडणूक?

हरियाणात एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत.

०१ ऑक्टोबरला हरियाणात मतदान होईल आणि ०४ ऑक्टोबरला निवडणुकांचे निकाल जाहीर होतील.

हरियाणात विधानसभेच्या ९० जागा असून त्यांपैकी ७३ खुल्या आणि १७ एससी प्रवर्गातील आहेत.

या कारणाने महाराष्ट्राच्या तारखा जाहीर नाहीत

महाराष्ट्र विधानसभेचा सध्याचा कार्यकाळा हा नोव्हेंबरमध्ये संपत आहे. म्हणजे नोव्हेंबर अखेरीस राज्यात नव्या सरकारची स्थापना होणं अपेक्षित आहे.

त्यासाठी राज्यात ऑक्टोबर महिन्यात विधानसभेसाठी निवडणुका होतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.

पण महाराष्ट्राच्या तारखा जाहीर करण्यात आल्या नाहीत. त्यासंबंधी प्रश्न विचारल्यावर उत्तर देताना राजीव कुमार यांनी सांगितलं की, “गेल्या वेळी महाराष्ट्र आणि हरियाणाची निवडणूक एकत्र झाली होती. पण त्यावेळी जम्मू काश्मीरचा मुद्दा नव्हता. यावेळी चार राज्यांत निवडणुका आहेत. नंतर लगेचच पाचव्या राज्यात म्हणजे दिल्लीतही. त्यामुळं सुरक्षा दलांच्या उपलब्धतेचा विचार करून आम्ही दोन निवडणुका एकत्र घेण्याचा निर्णय घेतला.”
जम्मू-काश्मीरची निवडणूक सुरू असताना मध्येच दुसऱ्या निवडणुकीच्या घोषणेची शक्यता नाही, असंही त्यांनी म्हटलं.

राजीव कुमार यांनी पुढे म्हंटले की, “इतरही काही कारणे आहेत. महाराष्ट्रात पाऊस होता. तसेच गणेशोत्सव, पितृपक्ष, नवरात्र असे सण येत असल्याने आम्हाला एकावेळी दोन निवडणुका शक्य आहेत, असे वाटले नाही.”

विधानसभांच्या कार्यकाळाच्या सहा महिन्यांपर्यंत तसाही कालावधी असतो, असंही त्यांनी म्हंटले आहे.

महाराष्ट्रातील दोन नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे

राज्याच्या राजकीय स्थितीचा विचार करता यावेळी राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती अशी दोन आघाड्यांमध्ये निवडणूक होणार हे जवळपास स्पष्ट आहे.

महाराष्ट्रातील राजकीय स्थिती
महाराष्ट्रात राजकीय स्थितीचा विचार करता २०१९ ते २०२४ ही पाच वर्ष एकामागून एक राजकीय धक्के किंबहुना भूकंप देणारी ठरली आहेत.

निवडणुकांच्या आधीच्या आघाड्या, नंतरच्या आघाडाच्या, पक्षफुटी, पक्षांवर दावे, निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयातील खटले असे बरंच काही या पाच वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात घडलं आहे.

राज्यातील २८८ जागांच्या विधानसभेत२०१९ च्या निवडणुकीचा विचार करता भाजपने सर्वाधिक १०५ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर शिवसेनेनं ५६ , राष्ट्रवादी काँग्रेसने ५४तर काँग्रेसने ४४ जागा जिंकल्या होत्या.

पण सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपला सत्ता स्थापन करता आली नाही. शिवसेनेनं अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाच्या मागणीवरून भाजपची साथ सोडली. त्यानंतर महाविकास आघाडीचा प्रयोग झाला आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं.

हे सरकार सत्तेत असतांनाच शिवसेनेला धक्का देत एकनाथ शिंदेंनी बंड केले. फडणवीसांच्या साथीनं त्यांनी सत्ता स्थापन करत मुख्यमंत्रीपद मिळवलं. त्यानंतर शिवसेना पक्ष आणि चिन्हंही त्यांना मिळाले.

त्यानंतर लोकसभेच्या काही महिन्यांपूर्वी अजित पवारांनीही शरद पवारांशी बंड केले. तेही शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांनाही राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षचिन्हं मिळालं.

आता या सर्व राजकीय गुंतागुंतीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात निवडणुका होणार आहेत. त्यामुळे ठरावीक वेळेनुसार ऑक्टोबरमध्येच निवडणुका होणार की लवकर याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे.