जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

अंत्यसंस्कार होत असलेल्या मृतदेहाचे मांस खाणाऱ्या राक्षसांना पोलिसांनी केले गजाआड

1 min read

भुवनेश्वर: (वृत्तसंस्था)- ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यात दोन मानवरूपी राक्षसांनी एक अतिशय धक्कादायक आणि विचित्र घटनेला जगा समोर आणले. त्या नराधमांनी अंत्यसंस्कार सुरू असताना अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे मांस खाल्ले. मयूरभंज जिल्ह्यातील बांधसाही गावात ही घटना घडली. या गावातील बहुतांश लोकसंख्या आदिवासी समाजातील आहे. पोलिसांनी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या दोघांना अटक केली आहे. सुंदर मोहन सिंह (५८) आणि नरेंद्र सिंह (२५) अशी दोघांची नावे आहेत. बांधसाही गावात वास्तव्यास असलेली २५ वर्षीय मधुस्मिता सिंह ही आजारी होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. मधुस्मिताचे पार्थिव अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत आणण्यात आले. त्यावेळी तिथे सुंदर मोहन सिंह आणि नरेंद्र सिंह उपस्थित होते. शोकाकुल वातावरणात मधुस्मितावर अंत्यसंस्कार सुरू होते.अंत्यविधी सुरू असताना सुंदरने काळीजादू केली. त्यानंतर त्याने मृतदेहाचे मांस खाल्ले. अविवाहित महिलेच्या मृतदेहाचं मांस खाल्ल्यानंतर शक्ती मिळत असल्याचे त्याला वाटत होते. त्यामुळे त्याने नरेंद्रलादेखील मांस खाण्यास सांगितले. पोलीस चौकशीतही त्यांनी त्यांच्या कृत्याचे समर्थन करताना हेच कारण दिले. २५ वर्षीय मधुस्मिता सिंहने पीआरएम वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला होता.
मद्यधुंद अवस्थेत असलेल्या दोघांनी अर्धवट जळालेल्या मृतदेहाचा एका हिश्श्याचे तीन तुकडे केले. त्यांनी एक तुकडा स्वत:कडे ठेवला आणि बाकीचे तुकडे अग्नीत टाकून दिले . सुंदर आणि नरेंद्रचे हे कृत्य पाहून ग्रामस्थांना धक्काच बसला. त्यांनी दोघांना पकडले आणि चोप दिला. दोघांना खांबाला बांधून ग्रामस्थांनी पोलिसांना बोलावले. बांधसाही पोलीस ठाण्याचे कर्मचारी रात्री गावात पोहोचले. पोलिसांनी आरोपींना पोलीस ठाण्यात आणले. मधुस्मिताच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर आरोपींविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम २९७ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी मद्यधुंद अवस्थेत होते. त्यांना बुधवारी कोर्टात हजर करण्यात आले. या बाबतीत अधिक तपास संबंधित पोलिस करीत आहेत.

Copyright © All rights reserved. | www.beedsamratnews.com Designed by www.WizInfotech.com.