जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

लोकल रेल्वेत बाॅम्बस्फोट होणार असल्याची धमकी ; पोलिसांनी अडीच तासात केले आरोपीला जेरबंद

1 min read

आज रविवारच्या दिवशी सकाळी मुंबई नियंत्रण कक्षात मुंबईतील स्थानिक रेल्वेत बाॅम्बस्फोट होणार अशा प्रकारचा धमकीवजा फोन आला आहे. दरम्यान मुंबई पोलिसांनी अवघ्या दोन ते अडीच तासात आरोपी अशोक मुखिया याला ताब्यात घेतले असून चौकशीत कुठे ही बाॅम्ब नसल्याचे स्पष्ट झाले असून अधिक तपास मुंबई पोलीस करत आहेत.

मुंबई: (वृत्तसंस्था)- आज सकाळी मुंबईतील लोकलमध्ये सीरिअल बॉम्बस्फोट घडवणार आहे, असा धमकीचा फोन मुंबई पोलिसांना आला आहे. या फोननंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आली असून पोलिसांनी तात्काळ रेल्वे प्रशासनाला त्याची माहिती देऊन फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला आणि अवघ्या दोन अडीच तासातच फोन करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या आहे. फोन करणाऱ्याला अटक केल्यानंतर त्याची कसून चौकशी केल्यावर हा फेक कॉल असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आज सकाळी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात धमकीचा फोन आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने फोनवरून धमकी दिली. मुंबईत ट्रेनमध्ये सीरियल बॉम्बस्फोट होणार आहेत. मुंबईतील लोकलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला आहे, असे या व्यक्तीने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी कोणत्या लोकलमध्ये बॉम्ब ठेवला असे विचारताच फोन करणाऱ्याने लगेच फोन कट केला. पोलिसांनी लगेच त्याक्रमाकावर फोन करण्याचा प्रयत्न केला. पण त्याने फोन बंद केला होता. त्यानंतर पोलीस तात्काळ अलर्ट मोडवर आले. एकीकडे पोलिसांनी याबाबतची माहिती रेल्वे प्रशासनाला दिली. तर दुसरीकडे फोन कॉल कुठून आला याचा शोध घेण्यास सुरुवात केली. नियंत्रण कक्षात फोन आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ संबंधित पोलीस ठाण्याला माहिती दिली.

त्यानंतर मोबाईल क्रमांकाच्या आधारे आरोपीचे लोकेशन शोधून काढले . आरोपी जुहू परिसरात असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी लगेच जुहू पोलिसांना याबाबतची माहिती दिली. जुहू पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेऊन आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. फोन लावल्या पासून अवघ्या दोन अडीच तासातच जुहू पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अशोक मुखिया असे आरोपीचे नाव आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा कॉल करणाऱ्या अशोक मुखियाला जुहू पोलिसांनी विलेपार्ले येथील नेहरू नगर परिसरातून अटक केली आहे. तो २५ वर्षांचा आहे.मुंबईतील एका हॉटेलमध्ये हेल्पर म्हणून काम करतो. आरोपी बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समजते .

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींविरुद्ध बिहारमध्येही गुन्हा दाखल आहे. आता मुंबई पोलिसांसह गुन्हे शाखा आणि एटीएसचे पथकही या प्रकरणाचा तपास करत आहे. त्याने पोलिसांना फेक कॉल केल्याची माहिती उघड झाली आहे. सध्या आरोपीने धमकी का दिली?, तो दारूच्या नशेत होता का? या सर्व प्रश्नांचा तपास सध्या जुहू पोलीस करत आहेत. कोणत्याही रेल्वे स्थानकांवर किंवा रेल्वेत बॉम्ब ठेवण्यात आलेला नाही आहे. हा फक्त एक बनावट कॉल होता, असे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Copyright © All rights reserved. | www.beedsamratnews.com Designed by www.WizInfotech.com.