जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

अलास्काच्या समुद्रात सापडली रहस्यमयी सोनेरी अंडं

1 min read

वॉशिंग्टन: ( वृत्तसंस्था) समुद्रात असंख्य अद्भुत जीवांचा भांडार आहे तसेच जगातील समुद्रांमध्ये अनेक रहस्यं दडलेली आहेत. अमेरिकेच्या अलास्का किनाऱ्याजवळ समुद्रात एक अजब वस्तू मिळाली आहे. ही वस्तू सोन्यासारखी चमकते. नॅशनल ओशनिक अँड ऍटमॉस्फेरिक ऍडमिनिस्ट्रेशननुसार, ही चमकदार वस्तू स्पर्श केल्यावर त्वचेवरील ऊतींसारखी भासते. ही वस्तू समुद्रातील एखाद्या जीवाने दिलेल्या अंड्याचा अवशेष असू शकते. या अवशेषामुळे एखाद्या अज्ञात प्राण्याचा शोध लागू शकतो. या सोनेरी अंड्यावर सध्या संशोधन सुरू आहे.

ही वस्तू नेमकी काय आहे त्याचा शोध अद्याप लागलेला नाही. त्यामुळे रहस्य कायम असल्याचे राष्ट्रीय सागरी विज्ञान केंद्राच्या डॉ. टॅमी हॉर्टन यांनी सांगितले. ही एखादी नवीन प्रजाती असू शकते. खोल समुद्रात अज्ञात वस्तू सापडणे सामान्य आहे. आपल्याकडे शोधण्यासारखे बरेच काही आहे. आम्ही या वस्तूचा अभ्यास करत आहोत. हा कोणत्या प्रकारचा जीव आहे याचा शोध घेण्यासाठी आम्ही डीएनए चाचणी करणार आहोत. सदरील वस्तूला एक मोठं छिद्र पडले आहे. त्यामुळे त्याच्या आतून काहीतरी बाहेर पडले असावे, असे हॉर्टन म्हणाल्या.

अलास्काच्या किनाऱ्याजवळ सापडलेली वस्तू अंड्याचे आवरण किंवा स्पंज असू शकते, असा अंदाज हॉर्टन यांनी व्यक्त केला. एक्सेटर विद्यापीठात सागरी संरक्षण विभागात असोसिएट प्रोफेसर असलेल्या डॉ. लुसी वुडल यांनीही ही वस्तू स्पंज असू शकतो, असा कयास लावला. कालानुरुप स्पंजचे नुकसान झाले असावे. त्यामुळे त्याला छिद्र पडले असावे. मात्र तरीही यातून खोल समुद्रातील जीवनाचा अंदाज लावता येऊ शकतो. खोल समुद्रात अनेक रहस्यं दडलेली आहेत. त्याबद्दल संशोधन होण्याची गरज आहे. या सोनेरी वस्तूच्या संशोधनातून नेमकं काय हाती लागते याबद्दल उत्सुकता असल्याचे वुडल म्हणाल्या.


आतापर्यंत ज्या वस्तू पाहिल्या आहेत, त्यापेक्षा ही सोनेरी वस्तू पूर्णत: वेगळी असल्याचे प्लायमाऊथ विद्यापीठात खोल सागरी पर्यावरणशास्त्र विषय शिकवणाऱ्या प्राध्यापक केरी हॉवेल यांनी सांगितले. मी गेल्या २० वर्षांपासून खोल समुद्रातील वस्तूंचा शोध घेत आहे. पण अशी वस्तू आजतागायत पाहिलेली नाही. ही वस्तू अनोखी आणि अद्भुत आहे. त्यामुळे ती नेमकी काय आहे? हे मला जाणून घ्यायचं आहे. समुद्रातील अनेक प्रजाती अद्याप माणसाला माहीत नाहीत. ही त्यातली एखादी प्रजाती असू शकते, असा अंदाज हॉवेल यांनी बांधला आहे.