जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

7 December 2024

५८ वर्षांपूर्वी झालेल्या चोरी प्रकरणी आरोपी अटकेत

1 min read

बिदर: (वृत्तसंस्था)- कर्नाटक राज्यातील बिदर येथे एका ७८ वर्षीय व्यक्तीला एका म्हशीच्या चोरी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, हे प्रकरण ५८ वर्षांपूर्वीचे असल्याने या प्रकरणाने सर्वांचं लक्ष वेधून घेतले आहे.

गणपती विठ्ठल वागोरे असे या ज्येष्ठ नागरिकाचे नाव असून त्यांच्यावर १९६५ साली दोन म्हशी आणि एक रेडकू चोरल्याचा आरोप करण्यात आला होता.

मुरलीधरराव माणिकराव कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून दिनांक २५ एप्रिल १९६५ रोजी मेहकर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती . तसेच वागोरे यांना संबंधित प्रकरणात ५८ वर्षांपूर्वी पहिल्यांदा अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्याबरोबर दुसऱ्या एका आरोपीलाही अटक झाली होती.

अटकेनंतर काही दिवसांनी वागोरे यांना जामीन मिळाला होता . पण त्यानंतर ते फरार झाले. तर त्यांचा सहआरोपी ११ एप्रिल २००६ रोजी मरण पावला आहे.

गेल्या आठवड्यात वागोरे यांचा ठावठिकाणा आढळून आल्यानंतर त्यांना तत्काळ अटक करण्यात आली आहे. मात्र त्यांचे वय विचारात घेता त्यांना जामिनावर मुक्त करण्यात आले आहे.

खरं तर, म्हैस चोरीचे हे प्रकरण अनेक वर्षे थंड बस्त्यात गेलेलं होते. पण गेल्या आठवड्यात बिदर पोलिसांनी जुन्या प्रलंबित प्रकरणांच्या फाईल्सचा निपटारा करण्याचे काम हाती घेतले आहे.

या मोहिमेअंतर्गत, म्हैस चोरी प्रकरणाची ५८ वर्षांपूर्वीची फाईल पुन्हा एकदा पोलिसांच्या समोर आली. या प्रकरणातील आरोपीला पकडण्याचा शेवटचा प्रयत्न म्हणून पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली.

१९६५मध्ये बिदरमध्येच या म्हशींची चोरी झाली होती. या प्रकरणात गणपती विठ्ठल वागोरे आणि कृष्णा चंदर नामक दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती.

न्यायालयात हजर केल्यानंतर दोघांनीही आपल्या गुन्ह्याची कबुलीही दिली होती. पुढे काही दिवसांनी दोघांची जामिनावर मुक्तता करण्यात आली होती.

तुरुंगातून बाहेर पडताच दोन्ही आरोपींनी पुढच्या नोटिशींना आणि अटक वॉरंटना प्रतिक्रिया देणं बंद केले आणि ते गायब झाले होते.

यानंतर बिदर पोलिसांनी आजुबाजूच्या गावांमध्ये तपास पथकही पाठवले होते. पण पोलीस त्यांना कधीच शोधू शकले नाहीत. अखेर, काही दिवसांनी या प्रकरणाची फाईल पोलिसांनी बंद केली होती.

पण, गेल्या आठवड्यातील घडामोडींनी हे प्रकरण पुन्हा पोलिसांसमोर आले.
यासंदर्भात एका वृत्तवाहिनीला माहिती देताना बिदरचे पोलीस अधीक्षक चन्नबसवण्णा लंगोटी म्हणाले, “माझ्या सहकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. १९६५ साली वागोरे याला धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथून अटक करण्यात आलेली होती. त्यामुळे उमरग्यातच त्यांची शोधाशोध सुरू करण्यात आली.”

पोलीस अधिक्षक पुढे सांगतात, “याच तपासादरम्यान एका महिलेने हे प्रकरण आठवत असल्याचे पोलिसांना सांगितले. तसेच तिने वागोरे याच्याबाबतही माहिती पोलिसांना दिली.

संबंधित व्यक्ती आता नांदेडच्या ठाकळगाव परिसरात राहतो, अशी टीपही आरोपी बाबत त्या महिलेने पोलिसांना दिली. याच व्यक्तीच्या शोधात पोलीस गेली ५० वर्षे होते.”

पोलिसांच्या माहितीनुसार, “यानंतर त्यांनी ठाकळगावात आपले पथक पाठवले. त्याठिकाणी वागोरे हे एका मंदिरात राहत होते. वागोरे यांनी आपली ओळख पोलिसांसमोर उघड केली व आपणच तो आरोपी असल्याचे मान्य केले. यादरम्यान वागोरे हे न्यायालयात जाण्यासही घाबरत होते.”

अखेरीस , गणपती वागोरे यांना बिदरमध्ये आणण्यात आले. त्यांना कोर्टात हजर करून अटकेची कारवाई करण्यात आली. नंतर वागोरे यांची परिस्थिती पाहून प्रशासनाकडूनच त्यांना वकील पुरवण्यात आला. शेवटी वयाचे कारण देत वागोरे यांना जामीन मंजूर करून मुक्त करण्यात आले आहे.