जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

20 January 2025

चक्क रुग्णालयात घुसून आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांवर जीवघेणा हल्ला

1 min read

कोलकाता 🙁 वृत्तसंस्था) काही दिवसांपूर्वी कोलकातामधील आर.जी. कर वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करुन हत्या झाल्यानंतर डॉक्टरांनी निदर्शने केली. मात्र या दरम्यान १४-१५ ऑगस्टच्या रात्री येथे हिंसाचार झाला आहे.

डॉक्टर निषेध आंदोलन करत असताना अज्ञात व्यक्तींच्या जमावाने रुग्णालयाच्या परिसरात प्रवेश करुन आंदोलनाची जागा, वाहने तसेच सार्वजनिक संपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे .

या घोळक्याने बलात्कार आणि हत्येच्या जागीही तोडफोड केल्याचा दावा सोशल मीडियात केला जात आहे.

मात्र कोलकाता पोलिसांनी हा सोशल मीडियाचा दावा फेटाळला आहे. गुन्ह्याची जागा सेमिनार हॉल आहे, तेथे कोणीही हात लावलेला नाही. खोट्या बातम्या पसरवू नका, अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी म्हटलं आहे.
कोलकाताचे पोलीस आयुक्त विनित कुमार याबद्दल बोलतांना म्हणाले, जे झालं ते माध्यमांतील आवाहनांमुळे झालं आहे.

पश्चिम बंगालमधील सत्ताधारी असलेल्या तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) राष्ट्रीय सरचिटणीस आणि लोकसभा खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी या गुंडशाही आणि हिंसेने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत अशी प्रतिक्रिया दिली आहे. यामागे असलेल्या सर्व लोकांची २४ तासांच्या आत ओळख पटवून कारवाई सुरू करू असंही ते म्हणाले.

या बाबतीत कोलकाता पोलीस काय म्हणाले?

हिंसेनंतर माध्यमांशी बोलतांना कोलकाता पोलीस आयुक्त विनित कुमार म्हणाले, हे सर्व माध्यमातील चुकीच्या मोहिमांमुळे झालं आहे. हे अयोग्य मीडिया कॅम्पेन आहे.

कोलकाता पोलिसांनी काय केलं नाहीये? कोलकाता पोलिसांनी सर्व काही केलं आहे. आम्ही (पीडित) कुटुंबीयांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला मात्र अफवा पसरत गेल्या, मला प्रचंड राग आला आहे.
पोलीस आयुक्त म्हणाले, “आम्ही काहीही चूक केलेली नाही, पण या चुकीच्या मीडिया कॅम्पेनमुळे कोलकाता पोलिसांनी लोकांचा विश्वास गमावला आहे.

या प्रकरणात फक्त एकच आरोपी आहे, असं आम्ही कधीच म्हटले नव्हते. शास्त्रीय पुराव्यांची वाट पाहात आहोत, ते मिळण्यास वेळ लागतो असे आम्ही म्हटले होते.”

विनित कुमार म्हणाले, “केवळ अफवांच्या आधारे आम्ही एका तरुण पीजी विद्यार्थ्याला अटक करू शकत नाही. माझी विवेकबुद्धी या गोष्टीची साक्षीदार होऊ शकत नाही.”

माध्यमांकडून आणि इतरांकडूनही आपल्यावर भरपूर दबाव असल्याचे ते सांगतात.

ते म्हणाले, “आम्ही जे केलंय ते एकदम योग्य केलंय यात मला आजिबात शंका वाटत नाही, आता या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. ते निष्पक्ष तपास करतील, आम्ही सीबीआयला पूर्ण मदत करू.”

रात्री उशिरा काय घडलं?

एका वृत्तपत्राच्या प्रतिनिधी यांनी आंदोलनस्थळी झालेल्या हल्ल्याला प्रत्यक्ष पाहिले आहे. ते म्हणाले काही अज्ञात लोकांनी रुग्णालयावर हल्ला केला, त्यानंतर तणावाचं वातावरण निर्माण झालं.

यावेळेस माध्यमातील काही लोकांवरही हल्ला झाला. कॅमेरामनवर हल्ला झाला. तिथल्या गाड्यांवरही हल्ले केले गेले आहे. काही पत्रकार बऱ्याच अवधीसाठी आत अडकून पडले होते.

आंदोलनाच्या जागी भरपूर तोडफोड झाली. येथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये अनेक वाहनं आणि रुग्णालय परिसर अत्यंत वाईट स्थितीत असल्याचे दिसते.

या हिंसाचारानंतर आर.जी. कर रुग्णालयाच्या डॉक्टरांनी एक व्हीडिओ संदेश प्रसिद्ध केला आहे.

डॉक्टर म्हणतात, “आर. जी. कर येथे घडलेल्या घटनेनंतर आम्ही काही दिवस आंदोलन करत आहोत. रात्री ११ वाजता ऑल फिमेल मार्चचं आयोजन करण्यात आले होते . या मोर्चात महिला डॉक्टर्स शांततेत सहभागी होणार होत्या, तेंव्हा बाहेर अचानक ही सगळी गर्दी एकवटली.”
ते म्हणाले, “पोलीस ही गर्दी रोखू शकले नाहीत, सर्व जमाव आत घुसला. आम्ही आमचा जीव वाचवून पळालो, जे समोर येतील त्यांना ते मारत होते, डॉक्टरांनाच सर्वांत जास्त जखमा झाल्या आहेत. सर्व लोक वेगवेगळ्या ठिकाणी लपले होते. महिलांवरही या जमावाने हल्ला केला.”

डॉक्टरांनी सांगितलं, “जमावाने आंदोलनस्थळी मंच, खुर्च्या, पंखे सर्व तोडून टाकले.”

ते म्हणाले, “हा जमाव वेगवेगळ्या वॉर्डांत आणि महिलांच्या हॉस्टेलमध्येही घुसल्याचं कानावर आले आहे. इमर्जन्सी वॉर्ड नष्ट केला आहे. तिथं काहीच राहिलेलं नाही. पोलीस प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. ते आम्हाला मदत करू शकत नव्हते. आम्हाला वाचवा, असं आम्ही लोकांना आवाहन करत आहोत. परंतु आमचं आंदोलन थांबणार नाही. ते सुरूच राहाणार,” असं आंदोलनकर्त्या डॉक्टरांनी म्हटलं आहे.

या प्रकरणात तृणमूल काँग्रेसचे खासदार काय म्हणाले?

यावर अभिषेक बॅनर्जी यांनी ट्वीट केलं आहे. ते म्हणाले, “एक लोकप्रतिनिधी या नात्याने मी आताच कोलकाता पोलीस आयुक्तांशी चर्चा केली आहे. तसेच या हिंसेसाठी जबाबदार असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ओळख पटवून त्यांच्यावर २४ तासांच्या आत कारवाई करा. ते कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित असले तरी ही कारवाई सुरू करा असे सांगितले आहे. आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांच्या मागण्या योग्य आणि न्यायसंगत आहेत. त्यांच्या मागण्या अगदी मुलभूत आहेत. त्या पूर्ण व्हाव्यात यासाठी ते सरकारकडे मागणी करत आहेत. त्यांच्या संरक्षणाला प्राधान्य दिले पाहिजे.”

दरम्यान संपूर्ण राज्यात आंदोलन होत असताना आर.जी. करमध्येच हिंसा कशी झाली असा प्रश्नही विरोधी पक्षाकडून उपस्थित केला जात आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा अशी मागणी केली असून या हिंसेची दखल सीबीआयनेही घ्यावी असे म्हटले आहे.

_______________________________________

(सावधान: वरील बातमीही अन्य वेबसाईट्सवरील असून सदरील मजकुरासाठी बीड सम्राट न्युज पोर्टल जबाबदार नाही.)