पंकजा मुंडेंनी मराठा समाजावर कोरडे प्रेम दाखवून समाजाच्या भावनांशी खेळू नये-माऊली पवार
1 min readसोलापूर: (प्रतिनिधी)- मराठा समाजाच्या आरक्षण बैठकीतून उठून जाणाऱ्या पंकजा मुंडे यांनी मराठा समाजावर कोरडे प्रेम दाखवू नये अशी प्रतिक्रिया माऊली पवार यांनी दिली आहे. दरम्यान भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मोठं वक्तव्य केलं होते. महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आपण फेटा बांधणार नसल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. बीडमध्ये आयोजित एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्यावरून सोलापुरातील सकल मराठा समाजाने आक्रमक होत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडेंनी मराठा समाजावर कोरडं प्रेम दाखवू नये. मराठा समाजाला खरंच आरक्षण द्यायचं असेल तर ओबीसी आरक्षणातून देऊन दाखवा. उगीचच मराठा समाजाच्या भावनांशी खेळू नका, अशी संतप्त प्रतिक्रिया सकल मराठा समाजाच्या वतीने माऊली पवार यांनी व्यक्त केली आहे.
ओबीसीमधून आरक्षण द्या, आम्ही तुमच्यासाठी रक्त सांडू’
पंकजा मुंडे या भाजप-शिवसेनेचे युती सरकार असताना मंत्रिमंडळात होत्या. त्यावेळी मराठा समाज रस्त्यावर उतरून आरक्षणाची मागणी करत होता. त्यावेळी पंकजा मुंडेंनी मराठा समाजासाठी काहीही केले नाही. एक साधं पत्र देखील मराठा समाजाच्या आरक्षण समर्थनार्थ दिलं नव्हतं. उलट मराठा समाजाच्या आरक्षणावर बैठक सुरू असताना बैठकीतून निघून गेल्या होत्या. आज तुम्ही मराठा समाजाला आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत फेटा बांधणार नाही, असे म्हणता. मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर ओबीसी कोट्यातून देऊन दाखवा, हा मराठा समाज तुमच्यासाठी रस्त्यावर उतरेल. तुमच्यासाठी रक्त सांडू, अशी प्रतिक्रिया सोलापुरातील सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे.पंकजा मुंडेंनी केलेल्या वक्तव्यानंतर सकल मराठा समाजाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. पंकजा मुंडेंनी कोरडं प्रेम दाखवू नये. खरंच मराठा समाजाला पाठिंबा दिला तर, महाराष्ट्र राज्यातील व देशातील तमाम मराठा समाज तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असे माऊली पवार यांनी सकल मराठा समाजाच्या वतीने आवाहन केले आहे. राजकीय स्वार्थासाठी मराठा समाजाच्या भावनांशी खेळू नका, असेही माऊली पवार म्हणाले.