के.एस.के. मधील बेंचवर आक्षेपार्ह लिखाण ; जमाव संतप्त गुन्हा दाखल करण्याची मागणी
1 min read
बीड: (प्रतिनिधी)- बीड शहरातील के.एस.के.महाविद्यालयातील बेंचवर तसेच फळ्यावर एका विशिष्ठ धर्माविषयी आक्षेपार्ह मजकूर लिहील्याचा प्रकार आज दुपारी उघडकीस आला आहे. सदरील प्रकाराची माहिती कळताच जमावाने महाविद्यालय परिसरात मोठी गर्दी केली होती. पोलीसांनी तात्काळ धाव घेवून जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला . या प्रकरणात गुन्हा दाखल करू असे म्हणून पोलीस जमावाला घेवून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात येणार तोच तेथीलच एका प्राध्यापकाने हे मी करायला लावले असे सांगितल्याने जमाव आणखी आक्रमक झाला. यामुळे काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र पोलीसांनी जमावाला शांत केले. त्यामुळे जमाव शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आला असुन दुपारी उशिरापर्यंत या प्रकरणात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान पोलीसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. संबंधीत आक्षेपार्ह मजकुर लिहीणार्या समाजकंटकाला तात्काळ अटक करा अशी मागणी यावेळी जमावाकडून करण्यात आली आहे.