जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

बीड जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीने इन्स्टाग्रामवरून केली मदतीची याचना

1 min read

बीड: (प्रतिनिधी)- एका बालविवाह झालेल्या मुलीने चक्क इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकून वाचवण्यासाठी विनवणी केली आहे.अल्पवयीन मुलीच्या पोस्टनंतर प्रशासन खडबडून जागे होत संबंधितांविरुद्ध कारवाई केली आहे. या प्रकरणात नवरा मुलगा आणि नवरी मुलीचे आई-वडील, मामा- मामी, फोटोग्राफर, मंडपवाले यांच्यासह जवळपास ३० ते ४० जणांविरोधात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .सध्या बीड जिल्ह्यात बालविवाहाच्या प्रमाणात वाढ झाली असून शासन स्तरावर बालविवाह होऊ नयेत यासाठी अनेक उपाय योजना राबवल्या जात आहे. मात्र, तसे घडत नाही. प्रशासन आणि पोलीस यांच्या विरोधात जाऊन काही मंडळी कोणाला कळण्याआधीच रात्री च्या वेळी गुपचूपपणे एखाद्या निर्जनस्थळी बालविवाह लावण्याचे प्रयत्न करत आहेत. मात्र, अनेक वेळी पोलिसांची टीम त्या ठिकाणी पोहोचून बालविवाह करणाऱ्या किंवा लावणाऱ्या विरूद्ध कारवाया देखील करीत आहे. नुकतीच एका अल्पवयीन मुलीने सोशल मीडियावरील इंस्टाग्राम या ॲपवर ” माझं जबरदस्तीने लग्न केलंय. मला खूप मारले. लग्न नाही केलं तर मारून टाकू अशा धमक्या देखील दिल्यात. प्लीज मला वाचवा हो “. अशी पोस्ट केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ धावपळ करत या मुलीला ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दोन दिवसांपूर्वी बीड तालुक्यातील कुठेवाडी येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह तिच्या पालकांनी लावून दिला. त्यानंतर बालविवाह झालेल्या मुलीनेच चक्क इंस्टाग्रामवर खळबळजनक पोस्ट टाकली. या पोस्टमध्ये मुलीने म्हंटले आहे की, माझे काल जबरदस्ती लग्न केले आहे. मला खूप मारलं देखील आहे. धमक्या देऊन जबरदस्ती करून माझे लग्न लावून दिले आहे. प्लीज मला वाचवा हो. माझं लग्न पालवन गावातील मस्के यांच्यासोबत झालं आहे. मी तुम्हाला हे सांगते आहे असं कोणालाही सांगू नका मला मारून टाकतील. मला इथून घेऊन जा प्लीज मला वाचवा, अशी पोस्ट पाहिल्यानंतर पोलीस आणि स्थानिक प्रशासन हे खडबडून जागे होत कामाला लागले.प्रशासनाने ग्रामीण पोलिसांना घेऊन त्या मुलीची लागलीच सुटका केली आणि तिची बालगृहात रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणी ग्रामसेवक दत्ता लोमटे यांच्या फिर्यादीवरून अशोक कुठे ,राधा कुठे, विमल कुठे, सूर्यकांत काळे , गोदावरी काळे, छाया गव्हाणे , प्रदीप मस्के, पंडित मस्के , संगीता मस्के, मंडपवाला आणि छायाचित्रकार यांच्यासह ३० ते ४० जणांविरुद्ध बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.

Copyright © All rights reserved. | www.beedsamratnews.com Designed by www.WizInfotech.com.