जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

बीड सह राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती

1 min read

बीड: (प्रतिनिधी)- जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊसानंतर ऑगस्ट महिन्यात मात्र देशाच्या बहुतांश भागांत पावसात मोठा खंड पडल्यामुळे हंगामी पर्जन्यमानातही घट झाली आहे. एक जून ते २७ ऑगस्ट दरम्यान देशात सरासरीपेक्षा आठ टक्के कमी पाऊस झाल्याची आकडेवारी भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिली आहे.

पुढील सुमारे आठ ते दहा दिवस मोठा पाऊस अपेक्षित नसल्याने देशात आणि राज्यातही खरीपाची पिके जगवण्यासाठी प्रशासनाला उपलब्ध पाण्याचे नियोजन करावे लागण्याची चिन्हे दिसत आहेत.
जुलैमधील सरासरीपेक्षा जास्त पावसानंतर ऑगस्टमध्ये देशभरातील पावसात मोठा खंड पडला आहे.

ऑगस्टमध्ये मान्सूनचा मध्य भारतावरील पश्चिम-पूर्व अक्ष (मान्सून ट्रफ) बहुतांश काळ त्याच्या सर्वसाधारण स्थितीपेक्षा उत्तरेला, हिमालयाच्या पायथ्याशी राहिला. त्यामुळे हिमालयातील राज्ये, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांमधील पावसात वाढ झाली. मात्र, या काळात कमी दाबाच्या क्षेत्रांच्या अभावी मान्सूनचे मध्यवर्ती क्षेत्र (कोअर मान्सून झोन), दक्षिण आणि पश्चिम भारतात बहुतेक राज्यांमध्ये पाऊस सरासरीपेक्षा ४० ते ५० टक्के किंवा त्याहून कमी नोंदला गेला आहे.

आयएमडीच्या क्लायमेट रिसर्च अँड सर्व्हिसेसचे प्रमुख डॉ. कृष्णानंद होसाळीकर म्हणाले, ‘महाराष्ट्र राज्यात ऑगस्टमध्ये आतापर्यंत सरासरीपेक्षा ५६ टक्के कमी पाऊस नोंदला गेला असून, त्यामुळे हंगामी पर्जन्यमान सरासरीपेक्षा आठ टक्के कमी झाले आहे. मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अपुरा पाऊस नोंदला गेला आहे. विस्तारित अंदाजानुसार पुढील किमान आठ ते दहा दिवस मोठा पाऊस अपेक्षित नाही. सप्टेंबरमध्ये पाऊस कसा राहील याबाबतचा अंदाज ३१ ऑगस्टला जाहीर करण्यात येणार आहे .’

महाराष्ट्र राज्यात अपुरा पाऊस

(सरासरीपेक्षा २० ते ५९ टक्के कमी पाऊस झालेले राज्यातील १५ जिल्हे पुढीलप्रमाणे)

मध्य महाराष्ट्र : नंदुरबार, धुळे, अहमदनगर , सातारा, सांगली, सोलापूर,
मराठवाडा : बीड ,धाराशिव, जालना, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), परभणी, हिंगोली,

विदर्भ : बुलढाणा, अकोला,
अमरावती.

मान्सूनवर एल निनोचा प्रभाव अधिक
प्रशांत महासागरातील एल निनोची तीव्रता येत्या काळात आणखी वाढणार असून, पुढील वर्षीच्या पूर्वार्धापर्यंत ती कायम राहण्याची शक्यता ‘आयएमडी’ने वर्तवली आहे. एल निनोचा यंदाच्या मान्सूनवर प्रभाव पडत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दुसरीकडे इंडियन ओशन डायपोल (आयओडी) न्यूट्रल स्थितीत असून, अद्याप ‘आयओडी’चा मान्सूनवर सकारात्मक परिणाम पाहायला मिळालेला नाही. जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असला, तरी जून आणि ऑगस्ट हे दोन महिने कोरडे गेल्याने त्याचा खरिपाच्या पिकांवर विपरीत परिणाम झाला आहे. हवामान तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आता सप्टेंबरमध्ये परतीचा पाऊस सरासरीपेक्षा जास्त झाल्यास त्यातून काहीसा दिलासा मिळू शकणार आहे.