जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

7 December 2024

नशेच्या गोळ्या विकणाऱ्याला पोलिसांनी घेतले ताब्यात , बीडमध्ये नशेखोरांची संख्या वाढली

1 min read

बीड: (प्रतिनिधी)- बीड शहरात व जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून नशेची ओैषधी, गोळ्या , तसेच गांजा सर्रासपणे विकला जात असल्याने तरूण पिढी नशेच्या आहारी जात होती. अगदी बिनबोभाटपणे नशेच्या औषधांची विक्री सुरू होती. अखेर शहर ठाण्याचे पो.नि.मुकूंद कुलकर्णी आणि त्यांच्या टिमने नशेच्या औषधांचा व नशेच्या पदार्थांचा बाजार मांडणार्‍याविरूद्ध कारवाईचा फास आवळला आहे.

काल रात्री शहरातील कारंजा टॉवर परिसरात पोलिसांनी सापळा रचुन नशेची औषधी आणि गोळ्या विकणार्‍याच्या मुसक्या आवळल्या आहेत. यावेळी त्याच्याकडून १८५ बाटल्या आणि ११०० नशेच्या गोळ्या जप्त केल्या आहेत. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बीड शहर पोलिसांनी पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलिस अधिक्षक सचिन पांडकर, डीवायएसपी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली कारंजा टॉवर परिसरात काल रात्री १२.१५वाजण्याच्या सुमारास बीड शहर ठाण्याच्या टिमने शेख एजाज शेख हमीद (वय ४० रा.बुंदेलपुरा ह.मु.बागवान गल्ली, शाहुनगर, पांंगरी रोड बीड) या तरूणाची झडती घेतली .

यावेळी त्याच्या हातामध्ये दोन बॅग होत्या. पोलिसांनी त्या बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये विविध प्रकारच्या नशेची औषधी असलेल्या १८५ बाटल्या आणि ११०० नशेच्या गोळ्या आढळुन आल्या.

पोलिसांनी या कारवाईत अंदाजित ३५ हजार १०२ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असुन या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक किरण पवार यांच्या फिर्यादीवरून शेख एजाज हमीद याच्याविरूद्ध कलम ८(सी),२२(बी) गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापार्‍यावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ , सहकलम ३२८,२७६, भादंवि सह कलम १८ अ, १८(सी),२७(ख)(दोन) औषधी द्रव्य व सौंदर्यप्रसाधन अधिनियम १९४० भादंवि प्रमाणे बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई डिबी पथकातील पोलीस उपनिरीक्षक पवार, सय्यद अशफाक, मनोज परजणे, बाळासाहेब सिरसाट, पवार, शहेंशाह सय्यद आदींनी केली आहे.