बीड जिल्ह्यात वाळू माफियांचा धुमाकूळ, धंद्यात पोलिस कर्मचारी ही सहभागी
1 min readबीड (प्रतिनिधी)- बीड जिल्ह्यात वाळू माफियांनी धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा केला जात असून आज पहाटे सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने बीड तालुक्यातील कुर्ला येथील सिंदफणा नदी पात्रात दोन ठिकाणी छापे टाकले. सदरील कारवाईत एक हायवा, तीन ट्रॅक्टर आणि दोन जेसीबी असा ७८ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर दुसर्या कारवाईत 1 कोटी 9 लाख 60 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान पहिल्या कारवाईतील एक हायवा आणि दोन जेसीबीमध्ये पोलीसच भागिदार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्या गाड्या पोलीसांच्याच असल्याचे सांगण्यात येत आहे.
बीड तालुक्यातील कुर्ला येथील सिंदफणा नदी पात्रात कुमावत यांच्या पथकाने एक हायवा, तीन ट्रॅक्टर आणि दोन जेसीबी ताब्यात घेतले. या प्रकरणात गणेश शिवाजी गायकवाड, राहुल बबनराव बोरवले, संतोष मोहनराव जाधव या तिघांविरूध्द ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला तर दुसरी कारवाई कुर्ला येथील सिंदफणा नदी पात्रात करण्यात आली. याठिकाणी पोलीसांनी हायवा, ट्रॅक्टर, ढंपींग ट्रॉली, वाळू चाळण्याची चाळी असा एकुण 1 कोटी 9 लाख 60 हजार रूपयांचे मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात दत्ता ज्ञानेश्वर चित्रे (वय 28 रा.बीड), शामराव कल्याण आमटे (रा.खांडे पारगाव) या दोघांविरूध्द बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान वाळूच्या धंद्यात पोलीसांचा सहभाग हा विषय तसा जुनाच आहे. मात्र सिंदफणा नदी पात्रात झालेल्या कारवाईत पथकाने जी वाहने पकडली आहेत. त्यामध्येही दोन पोलीस कर्मचारी भागीदार असल्याचे समजते.