विजेवर सरकारचे नवे प्रयोग, दिवसा स्वस्त तर रात्री महागणार विज
1 min read
नवी दिल्ली: (वृत्तसंस्था)विजेच्या दरात बदल करण्यासाठी केंद्र सरकार नवीन नियम तयार करणार आहे. येणाऱ्या काही दिवसांत विजेचे दर बदलतील. दिवसा विजेच्या दरात २० टक्क्यांची कपात करण्यात येईल. तर रात्री विजेचे दर २० टक्क्यांनी वाढतील, अशी माहिती वीज मंत्रालयाकडून मिळत आहे. अक्षय ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. सकाळी आणि संध्याकाळच्या सुमारास ठराविक तासांमध्ये विजेचा वापर अधिक होतो. या वेळेत होणारी कामे दिवसभरात केल्यास विजबिलात २० टक्के बचत करता येईल. या बाबतीत वीज मंत्रालय नवीन नियम लागू करण्याच्या तयारीत आहे.या नव्या नियमांनुसार, दिवसा वीज २० टक्क्यांनी स्वस्त मिळेल. तर विजेचा सर्वाधिक वापर होत असलेल्या कालावधीत (पीक अवर्स) विजेचा दर २० टक्क्याने अधिक असेल. विजेच्या नियमांमध्ये बदल केल्यानंतर सध्या सर्वाधिक वीज वापर होत असलेल्या तासांमध्ये ग्रीडवर कमी दबाव पडेल, अशी अपेक्षा आहे. सकाळी ६ ते ९ आणि संध्याकाळी ६ ते रात्री ९ या कालावधीत विजेचा सर्वाधिक वापर होतो. सकाळी वॉशिंग मशीन, पाण्याची मोटर यासाठी वीज वापरली जाते. तर संध्याकाळी लोक कामावरुन परतल्यानंतर टीव्ही, एसीचा वापर करतात. त्यामुळे सकाळी आणि रात्रीच्या ठराविक तासांमध्ये विजेचा वापर अधिक होतो.एप्रिल २०२४ पासून व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांसाठी नवीन नियम लागू होणार आहे. एका वर्षानंतर कृषी क्षेत्राला वगळून बहुतांश ग्राहकांसाठी नवीन नियम लागू होणार आहे.